अमेरिकेच्या हवाई दलानं भारतीय वंशाच्या पायलटला दिली टिळा लावण्याची परवानगी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 22:38 IST2022-03-24T22:37:52+5:302022-03-24T22:38:15+5:30
अमेरिकेच्या हवाई दलात पायलट म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या भारतीय वंशाच्या पायलटला ड्युटीवर असताना टिळा लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

अमेरिकेच्या हवाई दलानं भारतीय वंशाच्या पायलटला दिली टिळा लावण्याची परवानगी!
अमेरिकेच्या हवाई दलात पायलट म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या भारतीय वंशाच्या पायलटला ड्युटीवर असताना टिळा लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. अमेरिकेकडून पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे. वायोमिंगमधील एफई वॉरेन एअर फोर्स बेसवर तैनात असलेल्या यूएस एअर फोर्स एअरमन दर्शन शाह यांना धार्मिक सवलतीचा भाग म्हणून कर्तव्यावर असताना टिळा लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी 22 फेब्रुवारी रोजी शाह पहिल्यांदाच अमेरिकेन हवाई दलाच्या गणवेशात असताना टिळा लावलेले पाहायला मिळाले.
"टेक्सास, कॅलिफोर्निया, न्यू जर्सी आणि न्यूयॉर्कमधील माझे मित्र मला आणि माझ्या कुटुंबीयांना मेसेज करुन शुभेच्छा देत आहेत की हवाई दलात असं काहीतरी घडलं आहे. त्याचा त्यांना खूप आनंद झाला आहे," शाह यांनी हवाई दलाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या एका लेखात असं म्हटलं आहे. "हे काहीतरी नवीन आहे. हे असं काहीतरी आहे ज्याबद्दल त्यांनी यापूर्वी कधीही असं ऐकलं नव्हतं किंवा ते शक्य होईल असंही वाटलं नव्हतं, परंतु ते शक्य झालं आहे", असंही दर्शन शाह म्हणाले.
शाह यांना त्यांच्या सहकाऱ्यांकडूनही यासाठी मोठा पाठिंबा मिळत आहे. "ड्युटीवर असताना आपली धार्मिक बाजू समजून घेऊन टिळा लावण्यास परवानगी मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. माझे सहकारी देखील त्यासाठी मला पाठिंबा देत आहेत. माझं अभिनंदन करत आहेत. कारण ही परवानगी मिळवण्यासाठी मी किती मेहनत घेतली याची त्यांना कल्पना आहे", असंही शाह म्हणाले. माझा गणवेश मी अमेरिकेच्या हवाई दलाचा सदस्य असल्याचं जसं दाखवून देतो. त्याचवेळी आता मला माझी ओळख असलेला टिळा देखील लावता येणार आहे, असंही ते पुढे म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून दर्शन शाह यासाठी प्रयत्न करत होते. अनेक पत्रव्यवहारांनंतर अखेर आज त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे आणि अमेरिकन हवाई दलानं त्यांची मागणी मान्य केली आहे.