दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या दादागिरीविरोधात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2017 05:58 PM2017-08-07T17:58:16+5:302017-08-07T17:58:28+5:30
दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या कृत्रिम बेटावर सैन्यीकरणाला अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपाननं विरोध दर्शवला आहे
मनिला, दि. 7 - दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या कृत्रिम बेटावर सैन्यीकरणाला अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपाननं विरोध दर्शवला आहे. तसेच दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांनीही चीनच्या दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त कृत्रिम बेटावरील वाढत्या बांधकामावर चिंता व्यक्त केली आहे. चीन या कृत्रिम बेटाचा लष्करासाठी वापर करून दक्षिण चिनी समुद्रावर मालकी हक्क करू शकतो, या भीतीपायी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपाननं चीनला विरोध केला आहे. शेजारील देशांनी दक्षिण चिनी समुद्राच्या वादात पडू नये, असा चीनचा आग्रह आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग ई म्हणाले, बाहेरील पक्षांनी या वादात हस्तक्षेप केल्यास तो आचारसंहितेचा भंग ठरू शकतो. चीननं जवळपासच्या सर्वच समुद्रांवर स्वतःचा दावा केला आहे. चीनच्या समुद्राच्या मार्गे जवळपास 5 ट्रिलियन अमेरिकी डॉलरचा अफाट तेल आणि वायूच्या देवाणघेवाणीचा व्यापार करते. दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रां(आसियान)तील फिलिपिन्स, मलेशिया, ब्रुनेईसह इतर 10 सदस्यांनी चीनच्या दक्षिण चीन समुद्रावरील मालकी हक्काला विरोध केला आहे. विशेष म्हणजे यात तैवानचाही समावेश आहे. पण अलिकडच्या काळात चीननं आसियान राष्ट्रांची विरोधाची धार कमी करण्यात यश मिळवलं आहे. दक्षिण चिनी समुद्राचं कायदेशीररीत्या वाटप झालं नाही. त्यामुळे शेजारील देशांनी चीनला विरोध करणं ही आचारसंहिता भंग ठरू शकते, असं चीननं स्पष्ट केलं आहे. मात्र त्यानंतरही अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपाननं चीनला विरोध केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी दक्षिण चीन समुद्रात चीनने बांधलेल्या कृत्रिम बेटाजवळ अमेरिकन नौदलाचे युद्धजहाज येऊन धडकल्याने दोन्ही देशांत तणाव वाढला होता. गस्ती मोहिमेवर असलेले अमेरिकेचे युद्धजहाज चीनच्या कृत्रिम बेटाजवळून गेले होते. ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे संभाळल्यानंतर प्रथमच अमेरिकन नौदलाने दक्षिण चीनच्या सागरामध्ये चीनला अशा प्रकारे थेट आव्हान दिले होते. सध्या दक्षिण चीनच्या समुद्राच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आहे.
संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर चीनने आपला हक्क सांगितला आहे. पण चीनची ही दादागिरी शेजारी देशांना अजिबात मान्य नाही. मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय कोर्टाने या प्रकरणी चीनच्या विरोधात निकाल दिला होता. संपूर्ण दक्षिण चीन सागर चीनच्या मालकीचा नसल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले होते. पण चीनला हा निकाल मान्य नाही. मालकी निर्माण करण्यासाठी दक्षिण समुद्रात चीनने छोटीछोटी कृत्रिम बेटे तयार करण्याचा सपाटा लावला आहे. दक्षिण चीन समुद्रात विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती असल्याने चीनने ही दादागिरी चालवली आहे. अमेरिकेला चीनची ही अरेरावी अजिबात मान्य नसून, अमेरिकेनेही दक्षिण चीन सागरातील आपला वावर वाढवला आहे. भविष्यातील धोके लक्षात घेऊन चीन या कृत्रिम बेटांवर लष्करी सुसज्जताही वाढवत चालला आहे.
अमेरिका-चीन संबंध
ट्रम्प येण्याआधीही अमेरिकन नौदलाने दक्षिण चिनी समुद्रात अनेक गस्ती मोहिमा राबवल्या आहेत. त्या सर्व मोहिमांना तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मंजुरी होती. ब्रुनेई, मलेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम आणि तैवान या देशांचा चीनला कडाडून विरोध आहे. सध्याच्या अमेरिकेच्या गस्ती मोहिमेमुळे दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढणार आहे.