PM मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेचे राजदूत संतापले; आता भारताने दिले सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 06:58 PM2024-07-19T18:58:56+5:302024-07-19T18:59:34+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच रशियाचा दौरा केला. या दौऱ्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे.

US Ambassador furious over PM Narendra Modi's Russia visit; Now India gave a befitting reply | PM मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेचे राजदूत संतापले; आता भारताने दिले सडेतोड उत्तर

PM मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेचे राजदूत संतापले; आता भारताने दिले सडेतोड उत्तर

America on PM Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच रशियाचा दौरा केला. या दौऱ्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनीही या दौऱ्यावर बोचरी प्रतिक्रिया दिली होती. "भारत-अमेरिकेचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक सखोल आहेत, पण भारताने या मैत्रीला हलक्यात घेऊ नये," असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेवर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी त्यांच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत अमेरिकन राजदूतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. "अमेरिकन राजदूताला त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. साहजिकच आमची मते वेगळी आहेत. पण, इतर देशांप्रमाणेच भारतही आपल्या धोरणात्मक स्वायत्ततेला महत्त्व देतो. अमेरिकेसोबतची आमची जागतिक धोरणात्मक भागीदारी, आम्हाला इतर काही मुद्द्यांवर मतभेदाचा आदर करण्याची संधी देते. भारत आणि अमेरिका परस्पर हिताच्या द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर नियमितपणे चर्चा करतात. पण, राजकीय गोष्टींवर चर्चा करण्याची आमची परंपरा नाही," अशी स्पष्टोक्ती जैस्वाल यांनी दिली.

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावर काय म्हणाले
पत्रकार परिषदेदरम्यान रणधीर जैस्वाल यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, "डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याची आम्हाला माहिती आहे. ही बातमी आल्यानंतर काही तासांतच पंतप्रधानांनी या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि घटनेचा तीव्र निषेध केला. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. अमेरिका ही आमचा सहकारी लोकशाही देश आहे आणि आम्हाला त्यांचेही कल्याण हवे आहे."

PM मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेला मिरची झोंबली
पंतप्रधान मोदी 8 ते 10 जुलै दरम्यान रशिया दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यामुळे पाश्चात्य देशांना मिरची झोंबलीये. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींचा रशिया दौरा अमेरिकेला आवडलेला नाही. त्यांच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर कठोर टिप्पणी केली आहे. पीएम मोदींचा दौरा नाटो बैठकीदरम्यान होत असल्याने अमेरिकाही संतापली होती. याबाबत अमेरिकेचे राजदूत गार्सेटी दिल्लीतील संरक्षण परिषदेत म्हणाले होते की, "भारताने अमेरिकेची मैत्री गृहीत धरू नये. मला माहिती आहे की, भारताला आपली धोरणात्मक स्वायत्तता आवडते, पण संघर्षाच्या काळात धोरणात्मक स्वायत्तता असे काही नसते. संकटाच्या वेळी आपण एकमेकांच्या बाजूने असायला हवे. केवळ शांततेसाठी उभे राहून चालणार नाही, तर शांततेशी खेळ करणाऱ्यांवर ठोस कारवाई केली पाहिजे." अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनीही भारताला रशियाविरोधात इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, "जर काही संघर्ष झाला, तर रशिया भारतापेक्षा चीनला प्राधान्य देईल."
 

Web Title: US Ambassador furious over PM Narendra Modi's Russia visit; Now India gave a befitting reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.