अमेरिकेचे माजी राष्ट्रपती Donald Trump यांना न्यायालयाचा दणका, रोज भरावा लागणार 7 लाख रुपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 11:09 AM2022-04-26T11:09:10+5:302022-04-26T11:10:08+5:30
न्यायाधीश आर्थर एंगोरोन यांनी ट्रम्प यांना रोज 10 हजार डॉलरचा (जवळपास 7.6 लाख रुपये) दंड भरण्याचा आदेश दिला आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे नेहमीच चर्चेत असतात. आता न्यूयॉर्कमधील अॅटर्नी जनरल यांच्यासोबतच्या एका कायदेशीर प्रकरणात न्यायाधिशांनी सोमवारी त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले. याच बरोबर त्यांना मोठा दंडही ठोठावला आहे.
ट्रम्प यांना मोठा दंड -
ट्रम्प, न्यूयॉर्कच्या अटॉर्नी जनरलकडून त्यांच्या व्यवसायिक सौद्याच्या एका चौकशीसंदर्भात जारी करण्यात आलेल्या समनला योग्य प्रकारे उत्तर देण्यास अयशस्वी ठरले, असा आरोप त्यांच्यावर आहे. यानंतर, न्यायाधीश आर्थर एंगोरोन यांनी ट्रम्प यांना रोज 10 हजार डॉलरचा (जवळपास 7.6 लाख रुपये) दंड भरण्याचा आदेश दिला आहे.
ट्रम्प यांच्या संस्थेने आकड्यांसोबत छेडछाड केली, तसेच अनेक रिअल इस्टेट डीलमध्ये टॅक्स कमी करण्याच्या उद्देशाने लोन कव्हरेज अनुकूल करण्याचे काम केले, असे ट्रम्प यांच्या विरोधात सुरू असलेल्या खटल्याच्या तपासातून समोर आले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाकडे डेमोक्रेट अटॉर्नी जनरल जेम्स यांच्या विजयाच्या स्वरुपात पाहिले जात आहे. जेम्स यांनी ट्रम्प यांच्यावर गेली अनेक महिने समनकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला होता.
न्यायालयात दस्तऐवज सादर केले नाही -
मॅनहट्टनच्या कोर्ट रूममध्ये निर्णय देण्यापूर्वी एंगोरोन म्हणाले, 'मिस्टर ट्रम्प, आपण आपल्या व्यवसायाप्रती अत्यंत गंभीर आहात, हे मला माहीत आहे. पण मीही माझ्या कामाप्रती गंभीर आहे.' खरे तर, ट्रम्प यांना वेळेत संबंधित दस्तऐवज न्यायालयात सादर करता आले नाही. यासाठी त्यांना मार्चची डेडलाईन देण्यात आली होती. आता न्यायालयाच्या आदेशाचे पालन करेपर्यंत त्यांना हा दंड भरावा लागेल. यातच आपण या निकालाविरोध अपील करू, असे ट्रम्प यांच्या वकिलाने म्हटले आहे.