अमेरिकेने युद्धबंदीची घोषणा केली, पॅलेस्टीनी रस्त्यावर आनंद साजरा करत असतानाच नेतन्याहूंनी नकार दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:43 IST2025-01-16T17:23:22+5:302025-01-16T17:43:43+5:30
पॅलेस्टीनी नागरिकांनी रस्त्यावर उतरत आनंदोत्सव साजरा केला खरा, परंतू काही वेळातच नेतन्याहू यांनी हमास-इस्रायल युद्धबंदीचा मसुदा आपण स्वीकारत नसल्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे.

अमेरिकेने युद्धबंदीची घोषणा केली, पॅलेस्टीनी रस्त्यावर आनंद साजरा करत असतानाच नेतन्याहूंनी नकार दिला
इस्रायल आणि हमासमधील गेल्या दीड वर्षापासून सुरु असलेले युद्ध थांबविण्याची घोषणा अमेरिका आणि कतारने केली. यामुळे पॅलेस्टीनी नागरिकांनी रस्त्यावर उतरत आनंदोत्सव साजरा केला खरा, परंतू काही वेळातच नेतन्याहू यांनी हमास-इस्रायल युद्धबंदीचा मसुदा आपण स्वीकारत नसल्याची घोषणा केल्याने खळबळ उडाली आहे.
यामुळे इस्रायल-हमास युद्ध सुरुच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे युद्धबंदीची घोषणा करून अमेरिका आणि कतार तोंडावर आपटले आहेत. नेतन्याहू यांच्या कार्यालयाने युद्धबंदी कराराला मान्यता देण्यासाठी एक अट ठेवली आहे. ती जोवर पूर्ण होत नाही तोवर यावर मंत्रिमंडळाची कोणतीही बैठक होणार नाही, तसेच मंजुरीही मिळणार नाही, असे म्हटले आहे.
हमास अंतिम क्षणाला फायदा उठवत असल्याचा आरोप नेतन्याहू यांनी केला आहे. जोवर हमास अंतिम क्षणाच्या संकटापासून लांब जात नाही तोवर आम्ही गाझा संघर्ष थांबविण्याच्या समझोता कराराला मंजुरी देणार नाही, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे.
नेतन्याहू यांनी बुधवारी रात्री उशिरा हा समझोता अद्याप पूर्ण झालेला नाही असे म्हटले होते. परंतू, उतावीळ असलेल्या अमेरिका आणि कतारने याची आधीच घोषणा करून टाकली होती. दुसरीक़डे भारतानेही या घोषणेचे स्वागत केले होते. परंतू नेतन्याहू यांनी काही वेळात आम्ही मंजुरी दिलेली नाही असे स्पष्ट केले आहे.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. यात १,२०० हून अधिक लोक मारले गेले होते. तसेच २५० हून अधिक लोकांना ओलिस ठेवले. त्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले आणि ४६,००० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले. तसेच गाझाची अंदाजे ९० टक्के लोकसंख्या विस्थापित झाली. यामुळे एक भयानक मानवीय संकट निर्माण झाले आहे. कतार आणि अमेरिका हे युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करत आहेत.