हमासवर अमेरिकेची मोठी कारवाई, आर्थिक निर्बंधांसह संघटनेशी संबंधित १० जणांवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 08:03 PM2023-10-18T20:03:01+5:302023-10-18T20:03:30+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलमध्ये जाऊन इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. 

U.S. announces sanctions against a group of 10 Hamas members and financial network over Israel attack | हमासवर अमेरिकेची मोठी कारवाई, आर्थिक निर्बंधांसह संघटनेशी संबंधित १० जणांवर बंदी

हमासवर अमेरिकेची मोठी कारवाई, आर्थिक निर्बंधांसह संघटनेशी संबंधित १० जणांवर बंदी

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. हमास आणि इस्रायलमधील युद्ध १२ व्या दिवशीही सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला होता, त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात दोन्ही बाजूंनी आतापर्यंत चार हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायलमध्ये जाऊन इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. 

हमाससोबतच्या युद्धात अमेरिका पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी उभी आहे. अमेरिकन सरकारच्या आदेशानुसार सुमारे २००० अमेरिकन सैनिक आणि युनिट्सना अलर्ट करण्यात आले आहे. अमेरिकेने अनेक प्रसंगी सांगितले आहे की, जोपर्यंत ते अस्तित्वात आहे तोपर्यंत ते इस्रायलची साथ सोडणार नाही. एपीच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेने हमासच्या १० सदस्यांवर बंदी घातली आहे. यासोबतच अमेरिकेने पॅलेस्टिनी दहशतवागी संघटनेवर आर्थिक निर्बंधही लादले आहेत. या बंदीनंतर ही संघटना गाझा, सुदान, तुर्कस्तान, अल्जेरिया आणि कतारमध्ये आर्थिक क्रियाकलाप करू शकणार नाही. 

दुसरीकडे, इस्रायलने गाझा पट्टीतील अल अहली हॉस्पिटलवर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात ५०० लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. यावर पॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद मल्की यांनी गाझा येथील हॉस्पिटलला जाणूनबुजून लक्ष्य केल्याचा आरोप इस्रायलवर  केला आहे. गाझा पट्टीत राहणाऱ्या लोकांची जाणीवपूर्वक हत्या केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, इस्रायली सैन्य गाझामध्ये जमिनीवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. याआधी इस्रायली लष्कराने उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना स्थलांतर करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विस्थापन दिसून आले. 

अमेरिकन नागरिकही उतरले रस्त्यावर
गाझा पट्टीवरील हल्ल्यानंतर लेबनानमधील अमेरिकन दूतावासाबाहेर हजारोंचा जमाव जमला होता. या जमावातील लोकांच्या हाती पॅलेस्टाईनचा झेंडा होता. हे लोक अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. याच वेळी जमावातील काही लोकांनी दूतावासाला आग लावली. एवढेच नाही, तर काहींनी अमेरिकेच्या दुतावासारून अमेरिकेचा झेंडा काढून त्या ठिकाणी पॅलेस्टाईनचा झेंडा लावण्याचाही प्रयत्न केला. याशिवाय, लेबननमध्ये सक्रिय असलेल्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने एक दिवसीय बंदची घोषणाही केली आहे. 

Web Title: U.S. announces sanctions against a group of 10 Hamas members and financial network over Israel attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.