ट्रम्पनी शेअर केलेल्या फोटोतला 'तो' कुत्रा झाला बरा अन् परतला कामावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 02:07 PM2019-10-31T14:07:10+5:302019-10-31T14:10:50+5:30
इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीला मारण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला कुत्रा अखेर बरा होऊन पुन्हा ड्युटीवर परतला आहे.
वॉशिंग्टनः इसिसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीला मारण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला कुत्रा अखेर बरा होऊन पुन्हा ड्युटीवर परतला आहे. उत्तर सीरियातल्या एका भूमिगत सुरूंगात इसिसचा म्होरक्या बगदादीचा पाठलाग करताना अमेरिकी लष्करातील एक कुत्रा जखमी झाला होता. आमच्या के 9 श्वान पथकातील सुंदर आणि प्रतिभावान कुत्रा जखमी झाल्याचंही ट्रम्पनी ट्विट केलं होतं. त्यांनतर पेंटागॉनच्या एका प्रवक्त्यानं पत्रकार परिषदेत तो कुत्रा बरा होऊन कामावर परतल्याची माहिती दिली आहे. गेल्या चार वर्षांपासून तो लष्करात कार्यरत आहे. पण त्यांचं नाव उघड केलेलं नाही.
बगदादीवर हल्ला केल्यानंतर सुरुंगात त्या कुत्र्याला शॉक लागला होता. त्यामुळे तो जखमी झाला. परंतु आता तो ठीक असून, कामावर परतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका कुत्र्याचा फोटो शेअर केला होता. तसेच त्यांनी कुत्र्याचं नाव उघड केलं नसलं तरी बगदादीला मारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कुत्र्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. विशिष्ट प्रजातीचे हे कुत्रे व्यक्तीची ओळख पटवण्यात सराईत असतात. लष्कराचे हे महत्त्वाचे सदस्य आहेत. तसेच काही विशेष अभियानात ते सेनेबरोबर काम करतात. तसेच फक्त सेनेबरोबरच काम करत नाही, तर शत्रूंची ओळख पटवून जवानांचं संरक्षण करतात.
We have declassified a picture of the wonderful dog (name not declassified) that did such a GREAT JOB in capturing and killing the Leader of ISIS, Abu Bakr al-Baghdadi! pic.twitter.com/PDMx9nZWvw
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 28, 2019
'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला ठार करण्यात आले आहे. त्याच्यासोबत तीन मुले आणि इतर सहकाऱ्यांचा सुद्धा खात्मा करण्यात आला आहे. या वृत्ताला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. अबू बक्र अल-बगदादी याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने मोठी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान अमेरिकेने भूसुरुंगात अबू बक्र अल-बगदादी याला ठार केले आहे.