अमेरिकेतील गोळीबार प्रकरणी एका संशयिताला अटक; दोन जण ठार, १२ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 02:11 AM2019-10-30T02:11:33+5:302019-10-30T02:11:51+5:30
ग्रीनव्हिला : अमेरिकेतील टेक्सासमध्ये शनिवारी रात्री एका पार्टीमध्ये अंदाधुंद गोळीबार करून दोन जणांना ठार केल्याप्रकरणी ब्रँडन रे गोन्झालिस (२३ ...
ग्रीनव्हिला : अमेरिकेतील टेक्सासमध्ये शनिवारी रात्री एका पार्टीमध्ये अंदाधुंद गोळीबार करून दोन जणांना ठार केल्याप्रकरणी ब्रँडन रे गोन्झालिस (२३ वर्षे) या संशयित आरोपीला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. या गोळीबारात १२ जण जखमी झाले आहेत.
टेक्सास ए अँड एम विद्यापीठापासून १५ किमी दूर असलेल्या ग्रीनव्हिलामध्ये सुरू असलेल्या पार्टीत सुमारे ७५0 जण सहभागी झाले होते. त्यातील एका व्यक्तीला ठार मारण्यासाठी हल्लेखोर आला असावा असा पोलिसांचा कयास आहे. केव्हिन बेरी व ब्रायन क्रेव्हन अशी या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. टेक्सास ए अँड एम विद्यापीठाने नव्हे तर तिथे शिकणारे विद्यार्थी व अन्य संबंधितांनी खासगीरित्या या पार्टीचे आयोजन केले होते.
या पार्टीच्या ठिकाणी मागच्या दाराने हल्लेखोराने प्रवेश केला व आपल्याकडे असलेल्या हँडगनमधून गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिथे प्रचंड गोंधळ माजला. सगळेजण आपला जीव बचावण्यासाठी सैरावैरा धावू लागले. त्याचा फायदा घेऊन हल्लेखोरही तिथून पळून गेला होता.
या प्रकरणी अटक केलेल्या ब्रँडन रे गोन्झालिस या संशयिताला ग्रीनिव्हिला येथील हंट काऊंटी जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. हा हल्ला आपण केला नसल्याचा त्याने दावा केला आहे.
प्रकृती चिंताजनक
या गोळीबारात जखमी झालेल्यांपैकी पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुर आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.