अमेरिकेचा येमेनमधील हौथींच्या तळांवर हल्ला, दहशतवाद्यांची मोठी हानी झाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 09:25 AM2024-01-14T09:25:19+5:302024-01-14T09:25:51+5:30
गेल्या शुक्रवारी अमेरिकेने येमेनमधील हौथींशी संबंधित २८ ठिकाणांवर हल्ले केले. त्या ठिकाणांतील ६०हून अधिक गोष्टी नष्ट करण्यात आल्या.
वॉशिंग्टन : अमेरिकेने पुन्हा एकदा येमेनमधील हौथी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली. त्यात या दहशतवाद्यांची मोठी हानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तांबड्या समुद्रात मालवाहू जहाजांवर हौथींनी हल्ले करण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळेच त्यांच्यावर अमेरिका प्रतिहल्ले करीत आहे.
गेल्या शुक्रवारी अमेरिकेने येमेनमधील हौथींशी संबंधित २८ ठिकाणांवर हल्ले केले. त्या ठिकाणांतील ६०हून अधिक गोष्टी नष्ट करण्यात आल्या. हौथींकडे असलेल्या रडार यंत्रणेलाही अमेरिकेने लक्ष्य केले होते. हौथींवर आणखी हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा अमेरिकेने कारवाई केली. येमेन देशानजीक तांबड्या समुद्रातून प्रवास करणाऱ्या अमेरिकी जहाजांना संपूर्ण संरक्षण देण्याची राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारची भूमिका आहे. त्यानुसार हौथी दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
याआधीही केले हल्ले
अमेरिकेने शुक्रवारी केलेल्या हल्ल्यात पाच हौथी ठार तर सहा जण जखमी झाले होते. शनिवारी केलेल्या हल्ल्यात हौथींची किती हानी झाली याचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. येमेनमधील काही भागांवर या दहशतवाद्यांची पकड आहे. तिथून ते आपल्या कारवाया करीत असतात.