अमेरिका करणार इसिसवर हल्ला!
By admin | Published: September 12, 2014 02:59 AM2014-09-12T02:59:57+5:302014-09-12T02:59:57+5:30
अमेरिका इस्लामिक स्टेटला (इसिस) दुर्बळ बनवून अखेरीस नष्ट करेल, असा निर्धार राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केला आहे.
वॉशिंग्टन : अमेरिका इस्लामिक स्टेटला (इसिस) दुर्बळ बनवून अखेरीस नष्ट करेल, असा निर्धार राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केला आहे. सिरियात हवाई हल्ले आणि इराकमध्ये आणखी ४७५ लष्करी सल्लागार नियुक्त करण्यासह इसिसविरुद्धच्या लष्करी मोहिमेचा व्यापक विस्तार करण्याची घोषणा त्यांनी केली.
आम्ही सर्वंकष, सातत्यपूर्ण दहशतवादविरोधी रणनीतीद्वारे इसिसला दुर्बळ बनवून अखेरीस नष्ट करू, असे ओबामा म्हणाले. मात्र, त्यांनी या दहशतवादी संघटनेला कधीपर्यंत नामोहरम करणार हे जाहीर केले नाही. ओबामांचे भाषण टीव्हीद्वारे संपूर्ण राष्ट्रामध्ये प्रसारित करण्यात आले. या दहशतवादी संघटनेचा नायनाट करण्यासाठी अमेरिका एका मोठ्या आघाडीचे नेतृत्व करेल. अमेरिका या दहशतवाद्यांविरुद्ध हवाई हल्ल्यांची मोहीम राबवेल.
इसिसविरुद्धच्या अमेरिकाप्रणीत आंतरराष्ट्रीय आघाडीसाठी विविध प्रकारचे योगदान देण्यासाठी तीन डझनांहून अधिक देश समोर आले आहेत. इसिसने इराक आणि सिरियाच्या मोठ्या भूभागावर ताबा प्राप्त केला असून हे क्षेत्र क्षेत्रफळाने ब्रिटनएवढे आहे. ही संघटना आता अधिक धोकादायक बनू लागली आहे.
ओबामांनी १५ मिनिटांच्या भाषणात सांगितले की, इराक सरकारसोबत
काम करताना आम्ही आमच्या प्रयत्नांना आमच्या नागरिकांचे रक्षण व मानवीय मोहिमांहूनही अधिक विस्तारित करू. त्यामुळेच इराकी दले आक्रमक झालेली असताना आम्ही इसिसच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. जमिनीवर दहशतवाद्यांशी लढत असलेल्या लष्करी दलांच्या मदतीत अमेरिका वाढ करेल, असे सांगून त्यांनी आणखी ४७५ लष्करी सल्लागार पाठविण्याची घोषणा केली. हे सल्लागार पोहोचल्यानंतर तेथील अमेरिकी सैनिकांची संख्या वाढून १,६०० होणार आहे. कर्करोगाप्रमाणे पसरलेल्या इसिसला उखडून टाकण्यासाठी वेळ लागेल, असेही ओबामा म्हणाले. (वृत्तसंस्था)