मंगळ यानांच्या सुरक्षेबाबत अमेरिका, चीनने केली चर्चा, दोन्ही यानांची टक्कर न होण्याची खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 06:01 AM2021-04-01T06:01:36+5:302021-04-01T06:02:39+5:30
safety of Mars spacecraft : अमेरिका व चीनने मंगळ ग्रहावर दाखल झालेल्या आपापल्या यानांच्या सुरक्षेबाबत या वर्षाच्या सुरुवातीस चर्चा केली होती, अशी माहिती पुढे आली आहे
बीजिंग : अमेरिका व चीननेमंगळ ग्रहावर दाखल झालेल्या आपापल्या यानांच्या सुरक्षेबाबत या वर्षाच्या सुरुवातीस चर्चा केली होती, अशी माहिती पुढे आली आहे. या दोन्ही प्रतिस्पर्धी देशांमध्ये झालेली चर्चा म्हणजे एक असामान्य घटना असल्याचे समजले जात आहे. अमेरिका, चीन व संयुक्त
अरब अमिरातची याने दाखल झाल्यानंतर मंगळाच्या आसपासचा परिसर यावर्षी थोडा गर्दीचा झाल्याचे समजले जाते.
अमेरिकी अंतराळ संस्था नासाचे रोव्हर फेब्रुवारीमध्ये लाल ग्रहाच्या पृष्ठभागावर उतरले होते. त्यानंतर त्याने काम सुरू केले होते.
तसेच चीनचे तियानवेन-१ हे यान मंगळ ग्रहाभोवती फिरत आहे व येत्या मे किंवा जून महिन्यात ते मंगळावर उतरण्याची तयारी करीत आहे. संयुक्त अरब अमिरातचे मंगळ यान त्या ग्रहाच्या कक्षेत केवळ प्रदक्षिणा करीत आहे व तेथे उतरण्याचा प्रयत्न करणार नाही.चीनची नॅशनल स्पेस एजन्सीने बुधवारी सांगितले की, दोन्ही देशांनी यानाच्या उड्डाणाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी जानेवारी ते मार्चपर्यंत नासाच्या शास्त्रज्ञांसमवेत बैठका घेतल्या होत्या.
तंत्रज्ञान चोरीसंबंधी चिंतांबाबत अमेरिकी कायदा नासा व चीनमध्ये कोणत्याही प्रकारच्या संपर्कास प्रतिबंध करीत आहे. नासाचे प्रशासक स्टीव्ह जुर्कजीक यांनी मागील आठवड्यात सांगितले होते की, हे त्याला अपवाद आहे.
नासा जेव्हा काँग्रेसला आश्वस्त करील की त्यांच्याकडील माहितीची सुरक्षा करण्यासाठी सक्षम तंत्रज्ञान आहे. त्यावेळी अपवाद करण्यात येईल. तथापि, त्यांनी सांगितले की, नुकतीच झालेली चर्चा दोन्ही देशांच्या यानाच्या कोणत्याही प्रकारच्या टक्कर होण्याच्या धोक्याबद्दल होती. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली.