अमेरिकन नागरिकाचा 'किंग्डम ऑफ दीक्षित'वर दावा; मीच तिथला राजा, सुयश दीक्षित खोटं बोलत असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 04:01 PM2017-11-17T16:01:25+5:302017-11-17T21:44:22+5:30
भारतीय नागरिक असलेल्या सुयश दिक्षित या तरुणाने सुदान आणि इजिप्त यांच्यामध्ये असलेल्या बीर ताविल नावाच्या एका भूभागावर दावा केल्यानंतर एका अमेरिकन नागरिकाने आपण आधापासूनच या जागेचा मालक असल्याचा दावा केला आहे
मुंबई - भारतीय नागरिक असलेल्या सुयश दीक्षित या तरुणाने सुदान आणि इजिप्त यांच्यामध्ये असलेल्या बीर ताविल नावाच्या एका भूभागावर दावा केल्यानंतर एका अमेरिकन नागरिकाने आपण आधीपासूनच या जागेचा मालक असल्याचा दावा केला आहे. पूर्णतः वाळंवट असलेल्या या जागेला सुयश दिक्षितने 'किंग्डम ऑफ दीक्षित' म्हणजे 'दीक्षितांचं राज्य' असं नावच देऊन टाकलं होतं. मात्र अमेरिकन नागरिक जेरेमिया हिटॉन यांनी ही जागा आपली असून, सुयश दीक्षित खोटं बोलत असल्याचा दावा केला. सुयश बीर ताविल येथे पोहोचलाच नव्हता असं जेरेमिया हिटन यांचं म्हणणं आहे. मात्र नंतर दोघांमध्ये प्रकरण मिटलं आणि जेरेमिया यांनी आपले ट्विट डिलीट करत सुयशचं अभिनंदन केलं.
ट्विटरवर जेरेमिया हिटॉन यांनी सलग ट्विट करत सुयशचे दावे खोटे असल्याचा आरोप केला होता. इजिप्तच्या लष्कराच्या परवानगीशिवाय बीर ताविल येथे पोहोचणे शक्यच नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, 'तू खोटारडा आहेस. तू तुझ्या कुटुंबाला शरमेने मान खाली घालायला लावली आहे. इजिप्त लष्कराच्या परवानगीविना तिथे पोहोचू शकत नाही. तू माझ्याकडे मदत मागितली होती. तुझा प्रवास खोटा आहे'.
2014 मध्ये जेरेमिया हिटॉन बीर ताविल येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी या जागेवर दावा केला होता. या जागेला त्यांनी 'किंग्डम ऑफ नॉर्थ सुदान' असं नावही दिलं होतं. पुढे त्यांनी लिहिलं होतं की, 'सुयशने बीर ताविल येथे जाण्यासाठी माझी मदत मागितली होती. त्यांनी इजिप्तकडून परवानगी न मिळाल्याने माझी मदत मागितली होती. नियम बदलले असल्याने हे शक्य नसल्याचं मी सांगितलं होतं'.
पण नंतर या प्रकरणाने अचानक वळण घेतलं आणि जेरेमिया यांनी आपले ट्विट डिलीट करत सुयश एक उत्तम व्यक्ती असल्याचं सांगितलं. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, सुयश एक चांगला माणूस आहे आणि गेल्या तीन वर्षात बीर ताविल येथे किंग्डम ऑफ नॉर्थ सुदानने जे काम केलं आहे त्याला प्रसिद्धी दिली आहे.
बीर ताविल नावाचा एक भूभाग गेली अनेक वर्षे सुदान आणि इजिप्त यांच्यामध्ये आहे. दोन्ही देशांनी दोन वेगवेगळ्या सीमांना प्रमाण मानल्यामुळे हा ८०० चौ मैलांचा भाग तसाच राहिला. दोन्हीही देशांनी हा भाग आपला नसल्याचे सांगून त्यावर स्वामित्व हक्क सांगितला नाही. बीर ताविलवर कोणीही राहात नाही कारण ते पूर्णतः वाळंवट आहे. सुयशने इजिप्तमार्गे तेथे प्रवेश केला आणि त्या प्रदेशाचा तो राजा बनला. सुयशने आपल्या वडिलांकडे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख ही पदे सोपवली. तेथे त्याला वाळंवटात जगणारी पाल हा एकमेव प्राणी दिसल्याने त्या पालीला सुयशने राष्ट्रीय पशू जाहीर केले. त्याच्या राज्यात जातपात नसेल आणि भारतीय चलन चालेल असं स्पष्ट करत त्याने किंग्डम ऑफ दीक्षित नावाने संकेतस्थळ काढून नव्या नागरिकत्वासाठी लोकांना अर्ज करण्यास सांगितले होते.