Corona Virus : अमेरिकेत कोरोनाचा स्फोट, परिस्थिती चिंताजनक; एकाच दिवसात आढळले 11 लाख नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 03:43 PM2022-01-11T15:43:02+5:302022-01-11T15:43:45+5:30
यापूर्वी, 3 जानेवारीला अमेरिकेत 10 लाख 3 हजारहून अधिक नवे रुग्ण समोर आले होते. वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉनने अमेरिकेत कहर केला आहे.
ओमिक्रॉन व्हेरिअंट कमी घातक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, असे असले, तरी अमेरिकेतील नव्या कोरोना रुग्ण संख्येने विक्रम पातळी गाठली आहे. येथे सोमवारी 11 लाखांहून अधिक रुग्ण समोर आले. याच बरोबर, रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्याही सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे.
यापूर्वी, 3 जानेवारीला अमेरिकेत 10 लाख 3 हजारहून अधिक नवे रुग्ण समोर आले होते. वेगाने पसरणाऱ्या ओमिक्रॉनने अमेरिकेत कहर केला असल्याचे, या वाढत्या रुग्ण संख्येवरून दिसून येते. चिंताजन व्हेरिअंट मानल्या गेलेल्या Omicron ने अमेरिकेतील हॉस्पिटलायझेशनची संख्या सर्वोच्च पातळीवर नेली आहे. गेल्या तीन आठवड्यांत ही संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. गत वर्षी जानेवारी महिन्यात ही संख्या 1,32,051 एवढी होती.
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, रविवारी अमेरिकेत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 60 कोटींवर पोहोचली आहेत. जानेवारी 2020 पासून देशात 8,37,594 जणांचा मृत्यू झाला आहे.
रुग्णालयात स्टाफची कमतरता, ऑपरेशन्स थांबवले -
अत्यंत संसर्गजन्य असलेल्या ओमायक्रॉन प्रकारामुळे, अमेरिकेत रुग्णांचे भरती होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यामुळे, येथील अनेक रुग्णालयांमध्ये इतर रुग्णांच्या शस्त्रक्रिया थांबवण्यात आल्या आहेत. आकडेवारीनुसार, अमेरिकेत प्रति 10 लाख लोकांमागे रोज 2130 हून अधिक रुग्ण संक्रमित होत आहेत. अर्था कोरोना महामारीच्या बाबतीत अमेरिकाही आता ब्रिटनच्या वाटेवर पुढे जात आहे.
दुसरीकडे, फ्रान्समध्येही कोरोना रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. येथील परिस्थितीही ब्रिटनसारखीच होताना दिसत आहे. गेल्या सात दिवसांच्या सरासरीनुसार, फ्रान्समध्ये प्रति 10 लाख लोकांमागे 4,000 रुग्ण समोर येत आहेत.