कोरोना लस घेतली ना, मग नको डिस्टन्सिंग, नको मास्क; अमेरिका भलतीच 'बिनधास्त'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 09:30 AM2021-03-09T09:30:59+5:302021-03-09T09:42:14+5:30
US CoronaVirus: अमेरिकेत कोरोना लसीकरणाचा वेग वाढल्यानं दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्याची तयारी सुरू
वॉशिंग्टन: भारतात कोरोना लसीकरण वेगानं सुरू असताना दुसऱ्या बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे काही भागांत निर्बंध लागू करण्याची वेळ आली आहे. अमेरिकेत मात्र कोरोनाचा कहर (US CoronaVirus) कमी होताना दिसत आहे. लसीकरणाचा वेग वाढल्यानं प्रशासनानं निर्बंध हळूहळू शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्ती घरात एकत्र जमू शकतात. त्यासाठी मास्क घालण्याची गरज नाही, अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.
कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्ती आजाराचा धोका कमी असलेल्या व्यक्तींसोबत घरात एकत्र येऊ शकतात. लसीकरण पूर्ण झालेले वयोवृद्ध त्यांच्या मुलांची आणि नातवंडांची भेट घेऊ शकतात, अशा सूचना साथ नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानं (सीडीसी) सोमवारी जाहीर केल्या. अमेरिकेतही लसीकरण अभियानात ज्येष्ठांना प्राधान्य देण्यात आलं आहे. बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पूर्ण होत आलं आहे. या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांना भेटता यावं, यासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
...तर कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा भासणार; सीरम इन्स्टीट्यूटचा केंद्राला इशारा
कोरोना लसीकरणाचा वेग वाढल्यानं दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्याची तयारी अमेरिकन प्रशासनानं सुरू केली आहे. दिवसागणिक लसीकरणाचा वेग वाढत आहे. लस घेतलेल्या लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता दैनंदिन परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न आम्ही सुरू केले आहेत, अशी माहिती सीडीसीच्या संचालिक डॉ. रॉशेल वॅलेनस्की यांनी दिली.
लस घेतल्यानंतर महिनाभर काळजी घेणे गरजेचे!
लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्ती सोशल डिस्टन्सिंग, विनामास्क एकत्र येऊ शकतात, अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी झाल्यानंतर निर्बंध आणखी शिथिल केले जातील. लसीकरण करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या वाढल्यावर निर्बंध कमी होतील, असं वॅलेनस्की यांनी सांगितलं.