अमेरिकी न्यायालयाकडून सोनियावरील खटला रद्द
By admin | Published: June 11, 2014 11:02 PM2014-06-11T23:02:24+5:302014-06-11T23:02:24+5:30
१९८४ च्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर एका शीख गटाने दाखल केलेला खटला अमेरिकन न्यायालयाने रद्द केला
न्यूयॉर्क : १९८४ च्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर एका शीख गटाने दाखल केलेला खटला अमेरिकन न्यायालयाने रद्द केला असून, या दंगलीसाठी सोनिया गांधी यांना वैयक्तिक पातळीवर जबाबदार धरता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे; पण सोनिया गांधी यांच्यावर पुन्हा खटला दाखल करण्यास या गटाला बंदी घालण्यात आलेली नाही.
अमेरिकेतील जिल्हा न्यायाधीश ब्रायन कोगन यांनी यासंदर्भात १३ पानी निकाल दिला असून, शीख फॉर जस्टिस गटाचा सोनिया गांधी यांच्या विरोधातील खटला घटना घडली त्या स्थळापासून दूर अंतरावर दाखल केलेला असल्याने, तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे या निकालपत्रात म्हटले आहे. शीख फॉर जस्टिस (एसएफजे) या गटावर पुढे सोनिया गांधी यांच्यावर खटले दाखल करण्यास बंदी घालावी ही सोनिया गांधी यांची मागणी मात्र अमान्य करण्यात आली आहे.
१९८४ च्या दंगलीला दहा वर्षे उलटून गेल्यानंतर १९९८ साली सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या, त्यामुळे १९८४ च्या दंगलीत झालेल्या हत्या व छळ यासाठी त्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे न्या. कोगन यांनी म्हटले आहे. एसएफजेने खटला दाखल करण्यापूर्वी ३० वर्षे आधी नवी दिल्ली येथे या दंगली घडल्या होत्या. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाला प्रत्युत्तर देणे कठीण आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सोनिया गांधी यांचे वकील रवी बात्रा यांच्या मते, या खटल्याचा निकाल चांगला लागला असून, एसएफजेने प्रसिद्धी मिळविण्यासाठी कुहेतूने केलेली कसरत न्यायालयाने फेटाळली आहे; पण एसएफजेचे विधि सल्लागार जी एस पन्नुन यांनी भविष्यातही काँग्रेस नेत्यांवर १९८४ च्या दंगलीबद्दल खटले दाखल करूअसे सांगितले. एप्रिल महिन्यात अन्य एका न्यायालयाने काँग्रेस पक्षाविरोधात दाखल करण्यात आलेले मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यासंदर्भातील एसएफजेचा खटला रद्द केला होता. (वृत्तसंस्था)