अमेरिकेतील न्यायालयाने मोदींना जारी केले समन्स
By admin | Published: September 27, 2014 06:56 AM2014-09-27T06:56:31+5:302014-09-27T06:56:31+5:30
चार दिवसांच्या ऐतिहासिक दौऱ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या भूमीवर पाऊल ठेवण्याच्या एक दिवस आधी येथील एका न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध समन्स जारी केले आहे.
न्यूयॉर्क : चार दिवसांच्या ऐतिहासिक दौऱ्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या भूमीवर पाऊल ठेवण्याच्या एक दिवस आधी येथील एका न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध समन्स जारी केले आहे.
गोध्रा हत्याकांडानंतर २००२ मध्ये गुजरातमध्ये झालेल्या जातीय दंगलींच्या संदर्भात ‘अमेरिकन जस्टिस सेंटर’ या एका स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या दिवाणी दाव्यात न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्याच्या संघीय न्यायालयाने हे समन्स जारी केले. दोन दंगलग्रस्तांच्या वतीने हा दावा दाखल केला गेला आहे. या दंगलींच्या काळात मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते व त्या नात्याने त्यांना दाव्यात प्रतिवादी केले गेले आहे.
वादींचे वकील गुरपतवंत सिंग पन्नुन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे समन्स बजावले गेल्यापासून २१ दिवसांत मोदी यांनी न्यायालयात आपले म्हणणे दाखल करणे गरजेचे असेल. तसे न केल्यास मोदी यांचा बचाव विचारात न घेता दाव्याचा एकतर्फी निकाल केला जाईल, असेही समन्समध्ये नमूद केले गेले आहे.
गुजरातमधील २००२ च्या दंगली हा मुस्लिमांचा पद्धतशीरपणे केलेला नरसंहार होता व याची जबाबदारी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मोदींवर येते. मानवतेविरुद्ध झालेल्या या गुन्ह्यांचा ठपका मोदींवर ठेवून शक्य झाल्यास त्यांच्याकडून दंगलग्रस्तांसाठी भरपाईही वसूल करावी, अशी विनंती वादींनी त्यांच्या २८ पानी दाव्यात केली आहे.(वृत्तसंस्था)