धक्कादायक! अमेरिकेत भारतीय कुटुंबातील चार जणांचा मृतदेह सापडला; दोन जुळ्या मुलांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 12:54 PM2024-02-14T12:54:25+5:302024-02-14T12:56:59+5:30
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भारतीय कुटुंबातील चार जणांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे कुटुंब केरळमधील आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भारतीय कुटुंबातील चार जणांचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे कुटुंब केरळमधील आहे. मंगळवारी, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सॅन माटेओ, कॅलिफोर्निया येथे त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. आनंद सुजीथ हेन्री (४२), त्यांची पत्नी ॲलिस प्रियांका (४०) अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये त्यांच्या दोन जुळ्या मुलांचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील दोघांचा मृत्यू बंदुकीच्या गोळीमुळे झाला, तर इतर दोघांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस या प्रखरणात आत्महत्या आणि हत्या या दोन्हीकडून तपास करत आहेत.
मुलांकडून भीक मागून महिलेने ४५ दिवसांत कमावले २.५ लाख; पोलिसांनी केली अटक
एसी किंवा हिटरमधून कार्बन मोनॉक्साईड विषबाधा झाल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला, कारण यापूर्वी कुटुंबाने डोकेदुखी आणि मळमळण्याची तक्रार केली होती. पोलिसांना गॅस गळती किंवा घरातील उपकरणे खराब झाल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही.
सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावास भारतातील कुटुंबीयांच्या संपर्कात आहे. दूतावासाने शोकाकुल कुटुंब आणि भारतीय अमेरिकन समुदायाप्रती शोक व्यक्त केला आहे. मृत्यूमागील हेतू अद्याप अस्पष्ट असून पोलीस शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर सर्व समोर येईल असं सांगण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात, समीर कामथ, एक पर्ड्यू विद्यापीठाचा विद्यार्थी, वॉरेन काउंटीमध्ये मृतावस्थेत आढळले होते, नील आचार्य नावाचा आणखी एक पर्ड्यू विद्यार्थी, गेल्या महिन्यात कॅम्पसमध्ये मृतावस्थेत आढळला होता, तो अनेक दिवस बेपत्ता होता. आचार्य संगणक विज्ञान आणि डेटा विज्ञान मध्ये दुहेरी पदवी घेत होते.