सीरियन तळावर अमेरिकेने क्रूझ मिसाइलने केला मोठा हल्ला
By admin | Published: April 7, 2017 08:24 AM2017-04-07T08:24:57+5:302017-04-07T09:00:46+5:30
सीरियात रासायनिक शस्त्रांचा वापर झाल्यानंतर खवळलेल्या अमेरिकेने गुरुवारी रात्री सीरियाच्या हवाई तळाला लक्ष्य केले.
Next
ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा, दि. 7 - सीरियन नागरीकांवर रासायनिक हल्ला करण्यासाठी ज्या शायरत हवाई तळाचा वापर झाला त्याच तळाला गुरुवारी रात्री अमेरिकेने लक्ष्य केले. शायरत तळावर अमेरिकेने क्रूझ मिसाइलने मोठा हल्ला चढवला. अमेरिकेने 50 पेक्षा जास्त क्रूझ मिसाइल डागली. सीरियात रासायनिक शस्त्रांचा वापर झाल्याने आपण या कारवाईचे आदेश दिले.
अमेरिकेचे राष्ट्रीय हित नजरेसमोर ठेवूनच ही कारवाई करण्यात आली असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर अमेरिकेने केलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे. भविष्यात निष्पाप नागरीकांवर पुन्हा विषारी गॅसने हल्ला होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असे ट्रम्प यांनी सांगितले. सीरियातील रक्तपात, कत्तल थांबवण्यासाठी त्यांनी अन्य देशांनाही सहभागी होण्याचे आवाहन केले.
हा हल्ला करुन अमेरिकेने पहिल्यांदाच थेट सीरियन सरकार विरोधात कारवाई केली आहे. सीरियाचे राष्ट्रध्यक्ष बाशर असाद या हल्ल्याला जबाबदार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. मध्य सीरियातील बाशर सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या शायरत तळावर अमेरिकेने हल्ला केला. रासायनिक हल्ला करण्यासाठी सीरियन हवाई दलाच्या विमानांनी याच तळावरुन उड्डाण केले होते असे अमेरिकन अधिका-यांनी सांगितले.
पूर्व भूमध्यसागरात तैनात असलेल्या अमेरिकन नौदलाच्या जहाजांवरुन शायरत तळावर 60 टॉमाहॉक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. शुक्रवारी पहाटेच्या 3.45 च्या सुमारास शायरत तळावर स्फोटाचे मोठे आवाज सुरु झाले. या हल्ल्यात धावपट्टी, कंट्रोल टॉवर आणि दारुगोळायाचे भांडार उद्धवस्त झाले. सीरियाने आपल्याच नागरीकांवर लढाऊ विमानांव्दारे केलेल्या रासायनिक हल्ल्यात 100 जणांचा मृत्यू झाला होता. यात बहुतांश बालके होती.