पत्रपरिषदेतही दिसला अमेरिका-क्युबा तणाव
By admin | Published: March 23, 2016 03:31 AM2016-03-23T03:31:07+5:302016-03-23T03:31:07+5:30
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राऊल कास्त्रो यांच्या अभूतपूर्व संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान उभय देशांत गेल्या
हवाना : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि क्युबाचे राष्ट्राध्यक्ष राऊल कास्त्रो यांच्या अभूतपूर्व संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान उभय देशांत गेल्या ५० वर्षांपासून सुरूअसलेला तणाव दृश्य स्वरूपात पाहावयास मिळाला. दोन्ही नेत्यांनी यावेळी मानवाधिकार आणि अमेरिकी निर्बंधांच्या मुद्यावरून एकमेकांना मात देण्याचा प्रयत्न केला.
या संयुक्त पत्रकार परिषदेने क्युबावासीय हैराण झाले. कारण, या दोन्ही नेत्यांना आतापर्यंत विचारले गेले नसतील एवढ्या थेटपणे प्रश्न विचारले जात होते. उभय देशांतील संबंधात गेल्या १५ महिन्यांत भलेही वेगाने सुधारणा झाली असेल; परंतु या प्रश्नोत्तरांतून त्यांच्यात अजूनही तीव्र मतभेद असल्याचे अधोरेखित झाले. १५ महिन्यांपूर्वी ओबामा व कास्त्रो यांनी दोन्ही देश शीतयुद्धाच्या काळापासूनची मुत्सद्दी पातळीवरील कोंडी फोडत असल्याची घोषणा करून जगाला आश्चर्यचकित केले होते. हवानाच्या पॅलेस आॅफ रिव्होल्युशनमध्ये ही पत्रपरिषद झाली.
वैयक्तिक भेटीनंतर ओबामांसह कास्त्रो यांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत म्हणून त्यांचे मन वळविण्यासाठी व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांना अनेक आठवडे लागले होते. कास्त्रो यांनी पत्रकार परिषद घेणे ही दुर्मिळ बाब आहे. (वृत्तसंस्था)