मिशन शक्ती ही काळाची गरज, अमेरिकेकडून उपग्रहविरोधी चाचणीबाबत भारताचा बचाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 05:27 PM2019-04-12T17:27:12+5:302019-04-12T17:27:40+5:30
भारताने 27 मार्च रोजी मिशन शक्ती अभियानाद्वारे उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेत अंतराळातील उपग्रह नष्ट केला होता.
वॉशिंग्टन - भारताने 27 मार्च रोजी मिशन शक्ती अभियानाद्वारे उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेत अंतराळातील उपग्रह नष्ट केला होता. दरम्यान, भारताने केलेल्या या चाचणीबाबत नासाने नाराजी व्यक्त केली असतानाच अमेरिकेन संरक्षण मंत्रालयाने मात्र या मोहिमेबाबबत भारताचा बचाव केला आहे. अंतराळामधील धोक्यांबाबत भारत चिंतीत आहे. त्यामुळे भारताने केलेले उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राचे परीक्षण ही काळाची गरज असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेने दिली आहे.
मिशन शक्ती या चाचणीअंतर्गत अंतराळातील उपग्रह नष्ट केल्यामुळे भारत अशी क्षमता बाळगणारा अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांनंतरचा चौथा देश बनला आहे. दरम्यान, अमेरिकेन संरक्षण खात्यातील अधिकारी जॉन ई हितेन यांनी सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीसमोर भारताने केलेल्या मिशन शक्तीबाबतची माहिती मांडली. ''भारत त्याच्यासमोर अंतराळामधून उद्भवू शकणाऱ्या धोक्यांबाबत चिंतीत आहे. त्यामुळेच त्यांनी अंतराळातील उपग्रह उद्ध्वस्त करण्याची चाचणी घेतली असावी, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जॉन ई हितेन यांनी भारताने केलेल्या उपग्रहविरोधी चाचणीची गरज तसेच त्यामुळे अंतराळात पसलेला कचरा याबाबतच्या प्रश्नांनाही उत्तर दिले. भारताने अंतराळातील उपग्रह उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राच्या मदतीने उद्ध्वस्त केल्यानंतर नासाने याबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच या चाचणीमुळे अंतराळात पसरलेल्या तुकड्यांमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला धोका पोहोचेल अशी भीती व्यक्त केली होती.