ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकाभर निदर्शने; घुसखोर, निर्वासित संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 11:49 PM2018-07-01T23:49:15+5:302018-07-01T23:49:25+5:30
अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या घुसखोरांबद्दल तसेच निर्वासितांबद्दल त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे असंख्य निर्वासित व त्यांच्या मुलांची ताटातुट झाली आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या घुसखोरांबद्दल तसेच निर्वासितांबद्दल त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे असंख्य निर्वासित व त्यांच्या मुलांची ताटातुट झाली आहे. या धोरणाविरोधात अमेरिकेतील काही शहरात भारतीय स्थलांतरितांसह असंख्य नागरिकांनी निदर्शने केली.
अमेरिकेची सीमा ओलांडून घुसखोरी करणाऱ्यांवर कोणतीही दयामाया न दाखविता कारवाई करण्याचे ट्रम्प सरकारने ठरविले आहे. त्यामुळे अशा निर्वासितांना त्यांच्या मुलांना वेगळे करुन तुरुंगात डांबण्यात आले. अशी दोन हजार मुले सध्या अमेरिकी प्रशासनाच्या ताब्यात आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच असे वक्तव्य केले होते की, अमेरिकेत बेकायदेशीररित्या प्रवेश करणाºयांना तत्काळ हाकलून दिले पाहिजे. त्यांच्यावर खटले चालवून त्यांना शिक्षा सुनावली जाण्याच्या प्रक्रियेत काही वर्षे निघून जातात. निर्वासितांसंदर्भात अमेरिकेत अस्तित्वात असलेले अनेक कायदे कुचकामी आहेत. अमेरिकेच्या सीमा सर्व दृष्टीने सुरक्षित असाव्यात अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे.