अमेरिकेकडून भारताला 50 कोटी डाॅलरची मदत, मोदी-बायडेन चर्चेनंतर अवघ्या पंधरा दिवसात मिळाला दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:06 AM2021-05-11T06:06:06+5:302021-05-11T06:10:36+5:30
गेल्यावर्षी भारताने अमेरिकेला केलेल्या मदतीची आठवण ठेवून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताला संपूर्ण सहकार्य करण्याची घोषणा केली होती.
वॉशिंगटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांच्याशी बातचीत केल्यानंतर १५ दिवसांच्या आत अमेरिकेकडून भारताला कोविड-१९ विरोधातील लढ्यासाठी सुमारे ५० कोटी डॉलरचे (सुमारे ३६६८ दशलक्ष रुपये) अर्थसाह्य व वैद्यकीय उपकरणांची मदत मिळाली आहे.
गेल्यावर्षी भारताने अमेरिकेला केलेल्या मदतीची आठवण ठेवून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताला संपूर्ण सहकार्य करण्याची घोषणा केली होती. भारताचा उल्लेख त्यांनी नैसर्गिक मित्र असा केला होता.
या १५ दिवसांत अमेरिका सरकारने तर भारताला मदत केलीच आहे; पण त्याबरोबरच मोठ्या कंपन्या व कंपन्यांच्या सीईओंनी बनविलेला ग्लोबल टास्क फोर्स, अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय नागरिक यांनीही मोठ्या प्रमाणात निधी व वैद्यकीय साहित्याची मदत केली आहे. हजारो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि इतर वैद्यकीय उपकरणे घेऊन अमेरिकी विमाने दररोज भारतात येत आहेत.
अमेरिकेतून मिळालेल्या ५० कोटी डॉलरच्या मदतीपैकी १०० दशलक्ष डॉलरची (७३३.६० दशलक्ष रुपये) मदत बायडेन प्रशासनाची आहे. ७० दशलक्ष डॉलर (५१३.४४८ दशलक्ष रुपये) औषधी कंपनी फायझरची
आहे.
साडेचार लाख रेमडेसिविरच्या डोसचाही त्यात समावेश आहे. एका डोसची शासकीय खरेदी किंमत ३९० डॉलर आहे. यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश आघी यांनी सांगितले की, या महिन्याच्या अखेरपर्यंत अमेरिकेच्या मदतीचा आकडा १ अब्ज डॉलरवर जाईल.
विविध संस्था आणि व्यक्तींकडून भारताला देण्यात आलेली मदत -
- बोईंग - १० दशलक्ष डॉलर
- मास्टरकार्ड - १० दशलक्ष डॉर
- गुगल - १८ दशलक्ष डॉलर
- ग्लोबल टास्क फोर्स - ३० दशलक्ष डॉलरची उपकरणे
- विनोद खोसला - १० दशलक्ष डॉलर
- जॉन टी. चेंबर्स - १ दशलक्ष डॉलर
- सेवा इंटरनॅशनल - १५ दशलक्ष डॉलर
- एएपीआय (भारतीय डॉक्टरांची संघटना ) - ३.६ दशलक्ष डॉलर
- इंडियासपोरा -२.५ दशलक्ष डॉलर
- जय शेट्टी - ४ दशलक्ष डॉलर
- प्रॉक्टर अँड गॅम्बल - ६.७ दशलक्ष डॉलर
- मेर्क - ५ दशलक्ष डॉलर
- वॉलमार्ट - २ दशलक्ष डॉलर
- सेल्सफोर्स - २.४ दशलक्ष डॉलर
- कॅटरपिलर - ३.४ दशलक्ष डॉलर
- डेलॉईट - १२ हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स