US Election 2020: डोनाल्ड ट्रम्प यांचे उपद्रवमूल्य कायम राहणार, निवडणूक हरले तरी रिपब्लिकन पक्षातील सर्वशक्तिमान नेते ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 05:46 AM2020-11-06T05:46:52+5:302020-11-06T06:41:43+5:30
US Election 2020: रिपब्लिकन पक्षाच्या पारंपरिक मतदारांनी ट्रम्प यांची पाठराखण तर केलीच शिवाय गौरवर्णीय अमेरिकी तरुणांनाही ट्रम्प यांनी आकर्षित केल्याचे दिसून येते. कारण २०१६ मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा ट्रम्प यांना यंदा ५० लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.
वॉशिंग्टन : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विद्यमान अध्यक्षीय निवडणूक हरण्याच्या बेतात असले तरी त्यांचे उपद्रवमूल्य कायम राहणार आहे. ते सहजासहजी व्हाइट हाऊसचा त्याग करतील, असे वाटत नाही. अध्यक्षपद सोडायची वेळ आली तरी त्यात ते अनेक ठिकाणी पाचर मारतील, असे बोलले जात आहे.
जो बायडेन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा सर्वाधिक प्रातिनिधिक मते (इलेक्टोरल व्होट्स) मिळाली असली तरी पसंतीच्या मतांमध्ये उभय नेत्यांत फारसे अंतर नाही. कोरोनासंकट हाताळण्यात आलेले अपयश, आक्रसलेली अर्थव्यवस्था, वाढती बेरोजगारी या सर्व नकारात्मक बाजू असतानाही सहा कोटी ८० लाख मतदारांनी ट्रम्प यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे, हे विशेष. रिपब्लिकन पक्षाच्या पारंपरिक मतदारांनी ट्रम्प यांची पाठराखण तर केलीच शिवाय गौरवर्णीय अमेरिकी तरुणांनाही ट्रम्प यांनी आकर्षित केल्याचे दिसून येते. कारण २०१६ मध्ये मिळालेल्या मतांपेक्षा ट्रम्प यांना यंदा ५० लाखांहून अधिक मते मिळाली आहेत.
२०२४ला उमेदवारी?
यंदाच्या निवडणुकीत २३ कोटी नोंदणीकृत मतदारांपैकी १६ कोटी मतदारांनी मतदान केले. त्यापैकी जवळपास सात कोटी मतदारांचा ट्रम्प यांना पाठिंबा असल्याने रिपब्लिकन पक्षातील सर्वशक्तिमान नेते म्हणून ट्रम्प यांच्याकडे पाहिले जाईल. त्यामुळे आता जरी या निवडणुकीत हरले तरी २०२४ मध्ये पुन्हा ते अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात उतरलेेले पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. अर्थात तोपर्यंत ट्रम्प यांचे वय ७८ असेल. परंतु त्यांचा सध्याचा फिटनेस पाहता रिपब्लिकन पक्षाकडून त्यांना पुढील निवडणुकीवेळी पुन्हा उमेदवारी मिळू शकते.
व्हाइट हाऊस सोडण्यापूर्वी...
अध्यक्षीय निवडणुकीत हरण्याच्या बेतात असले तरी व्हाइट हाऊस रिकामे करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अद्याप ७६ दिवसांचा कालावधी आहे. व्हाइट हाऊस सोडण्यापूर्वी ट्रम्प आपल्या हितशत्रूंचा पुरता बंदोबस्त करतील, अशी चिन्हे आहेत. त्यात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हिस्टिगेशनचे (एफबीआय) विद्यमान संचालक ख्रिस्तोफर रे आणि ट्रम्प यांच्या कोरोना हाताळणीवर सतत टीका करणारे डॉ. अँथनी फौची या दोघांचा प्रामुख्याने समावेश असेल.