US Election 2020: ज्याे बायडन फाॅर्मात, डाेनाल्ड ट्रम्प काेर्टात, अमेरिका निवडणूक मैदानात जाेरदार लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 05:35 AM2020-11-06T05:35:41+5:302020-11-06T06:44:05+5:30
US Election 2020: बायडन यांना मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि अरिझोना या राज्यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या पारड्यात मतांचा कौल दिल्याने बायडन यांचा अध्यक्षपदाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
वॉशिंग्टन : डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी गुरुवारी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आघाडी घेत २७० हा बहुमताचा जादुई आकडा गाठण्याच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू केली. व्हाइट हाऊसपर्यंत पोहचण्यासाठी बायडन यांना आता अवघ्या सहा प्रातिनिधिक मतांची (इलेक्टोरल व्होट्स) आवश्यकता आहे.
बायडन यांना मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि अरिझोना या राज्यांनी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या पारड्यात मतांचा कौल दिल्याने बायडन यांचा अध्यक्षपदाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बायडन यांना २६४ तर ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल व्होट्स मिळाल्याचे स्पष्ट झाले. ३ नोव्हेंबरला अखेरचे मतदान झाल्यानंतर अमेरिकेत मतमोजणी सुरू आहे. बुधवारी बायडन आणि ट्रम्प यांना मिळालेल्या प्रातिनिधिक मतांमध्ये अनुक्रमे २३८ आणि २१३ असा फरक होता. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा, अरिझोना, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलायना या सात राज्यांमधून काय निकाल येतो, याकडे लागले होते. गुरुवारी यापैकी मिशिगन, विस्कॉन्सिन, नेवाडा आणि अरिझोना या राज्यांनी बायडन यांना पसंती दिल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले. पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलायना या राज्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, या राज्यांपैकी जॉर्जिया आणि पेनसिल्व्हेनिया या राज्यांमध्येही बायडन पिछाडी भरून काढत असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीत घाेटाळे, फेरमतमाेजणी घ्या - ट्रम्प
आपला पराभव हाेताे की काय या भीतीने ग्रासलेल्या विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक निकालांप्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. विस्कॉन्सिन मतदारसंघात अनेक निवडणूक घोटाळे झाले असून तेथे फेरमतमोजणी व्हावी, अशा आशयाची विनंती सर्वोच्च न्यायालयात करणार असल्याचे ट्रम्प यांच्या कार्यालयातर्फे सांगण्यात आले. तसेच पेनसिल्व्हेनिया आणि मिशिगन येथील मतमोजणीसंदर्भातही संशय व्यक्त करत तेथील मतमोजणी थांबविण्याची मागणी ट्रम्प करणार आहेत.
श्रीनिवास ठाणेदार मिशिगनचे आमदार!
बेळगाव ते अमेरिका... अमेरिकेत शिक्षण घेऊन व्यवसायात बसवलेला जम... असे असूनही आपल्या मातीशी घट्ट नाते राखून असलेल्या श्रीनिवास ठाणेदार यांना आता डेमॉक्रॅटिक पक्षाचे ‘आमदार’ ही आणखी एक नवीन ओळख मिळाली आहे. मिशिगनच्या प्रतिनिधीगृहात त्यांना तब्बल ९३ टक्के मते मिळाली आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला अवघी सहा टक्केच मते मिळाली.