US Election 2020: लोकप्रियतेत ज्यो बायडन यांचीच आघाडी, अध्यक्षीय निवडणूक निकालांकडे जगाचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 05:28 AM2020-11-03T05:28:13+5:302020-11-03T06:38:43+5:30
US Election 2020: अभूतपूर्व अशा कोरोना कहराने जगातील एकमेव महासत्ता असलेली अमेरिका त्रस्त असताना अध्यक्षीय निवडणुकीचा कार्यक्रम होत आहे. कोरोना संसर्गामुळे अनेकांनी मुदतीच्या आत मतदान केले आहे, तर अनेकांनी टपाली मतदानाला पसंती दिली आहे.
वॉशिंग्टन : आक्रस्ताळे डोनाल्ड ट्रम्प हवे की, शांत-संयत ज्यो बायडन यांच्या हाती सत्तासूत्रे सोपवावी याचा अंतिम निर्णय आज, मंगळवारी अमेरिकी मतदार घेतील. दरम्यान, लोकप्रियतेत बायडन यांनी ट्रम्प यांना पिछाडीवर टाकल्याचे चित्र विविध कल चाचण्यांतून निदर्शनास येत आहे. त्यामुळे अध्यक्षीय निवडणुकीत कोण बाजी मारतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
अभूतपूर्व अशा कोरोना कहराने जगातील एकमेव महासत्ता असलेली अमेरिका त्रस्त असताना अध्यक्षीय निवडणुकीचा कार्यक्रम होत आहे. कोरोना संसर्गामुळे अनेकांनी मुदतीच्या आत मतदान केले आहे, तर अनेकांनी टपाली मतदानाला पसंती दिली आहे. आतापर्यंत ९ कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अध्यक्षपदी कोणाची निवड झाली, हे मतदानानंतर लगेचच समजू शकणार नाही. टपाली मतांची मोजणी करण्यासाठी किमान दोन आठवडे तरी लागणार आहेत. त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतसे अनेक कल चाचण्यांचे अहवाल प्रसिद्ध होऊ लागले आहेत. त्यात आतापर्यंत बायडन आघाडीवर असल्याचे चित्र आहे. अनेक राज्यांनी बायडन यांना झुकते माप दिल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, ट्रम्प यांची सारी मदार कुंपणावरच्या राज्यांवर आहे. या कुंपणावरच्या राज्यांपैकी अरिझोना, विस्कॉन्सिन, पेनसिल्व्हेनिया आणि फ्लोरिडा या राज्यांनी बायडन यांना आपली पसंती असल्याचे संकेत दिले.
डॉ. फौची यांची टीका
डॉक्टरांमुळेच कोरोना आटोक्यात येत नसल्याचे सांगत कोरोना कहराचे सारे खापर त्यांच्यावर फोडण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आहे. ट्रम्प महोदय या संकटाकडे फारसे गांभीर्याने पाहत नाहीत, हा त्यांचा दृष्टिकोन लोकांसाठी घातक असल्याची टीका अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲलर्जी अँड इन्फेक्शन्स या संस्थेचे प्रमुख डॉ. अँथनी फौची यांनी केली.
मंगळवारी मतदान झाल्यानंतर लगेचच रात्री उशिरापर्यंत अध्यक्ष निवडीची घोषणा होईल. टपाली मतदानाच्या मोजणीपर्यंत वेळ काढणे अशक्य आहे. आम्ही आमच्या वकिलांशी या विषयावर चर्चा करत आहोत. - डोनाल्ड ट्रम्प,
अमेरिकेचे अध्यक्ष.