US Election 2020: महोदय, ही अमेरिका आहे, इथे अध्यक्षांची निवड जनता करते!, डाेनाल्ड ट्रम्प यांना काेर्टाने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 03:10 AM2020-11-07T03:10:41+5:302020-11-07T06:34:00+5:30
US Election 2020: ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारयंत्रणेतर्फे अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये मतमोजणीविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. तसेच निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधातही न्यायालयात धाव घेतली आहे.
वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणूक प्रक्रिया तसेच मतमोजणीबाबत सातत्याने शंका उपस्थित करणाऱ्या विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यू यॉर्कच्या ॲटर्नी जनरल लतीशा जेम्स यांनी चांगलेच फैलावर घेतले.
ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारयंत्रणेतर्फे अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये मतमोजणीविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. तसेच निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविरोधातही न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्वांची एकत्रित सुनावणी करताना जेम्स यांनी ट्रम्प यांना फटकारले.
‘अध्यक्ष महोदय, ही अमेरिका आहे. इथे अध्यक्षांची निवड जनता करते. अध्यक्ष जनतेची निवड करत नाहीत. त्यामुळे लोकांची इच्छा काय आहे, हे जरूर ऐकले जाईल. तुम्ही त्यात ढवळाढवळ करण्याची गरज नाही’, इतक्या स्पष्ट शब्दांत न्यू यॉर्कच्या ॲटर्नी जनरलनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले आहे.
अनेक राज्यांत जो बायडेन यांनी आघाडी घेत असल्याचे स्पष्ट होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी रडीचा डाव सुरू केला आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला आहे, अनेक ठिकाणी मतमोजणीतच गैरप्रकार झाले आहेत वगैरे आरोप करत ट्रम्प यांनी संपूर्ण प्रक्रियाच थांबविण्याची मागणी केली होती. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा बागुलबुवा उभा करत ट्रम्प बेकायदेशीरपणे सत्ता हस्तगत करू पाहत आहेत, परंतु त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असेही जेम्स यांनी फटकारले.
आदळआपट केल्यामुळे वस्तुस्थिती बदलणार नाही
न्यू यॉर्कच्या ॲटर्नी जनरल लतीशा जेम्स यांनी ट्रम्प यांना कठोर शब्दांत सुनावले. त्या म्हणाल्या की, ‘ट्रम्प यांनी कितीही आदळआपट केली. कितीही बेछूट आणि दिशाभूल करणारे आरोप केले तरी त्यामुळे वस्तुस्थितीत बदल होणार नाही.
निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली आहे. प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. निवडणूक कर्मचारी निकाल लवकर लागावा यासाठी मतमोजणीची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहेत. या सर्व प्रक्रियेत कुठेही कायद्याचे उल्लंघन झालेले नाही, हे मी नि:संदिग्धपणे सांगू शकते. अमेरिकेत जनता अध्यक्षांची निवड करते, अध्यक्ष जनतेची निवड करत नाही.’