अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 07:27 AM2024-11-05T07:27:17+5:302024-11-05T07:27:49+5:30
US Election 2024: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान हाेत असून, यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प आणि डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात अत्यंत चुरशीची लढत हाेत आहे.
वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान हाेत असून, यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प आणि डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्यात अत्यंत चुरशीची लढत हाेत आहे. ही चुरस आजवरच्या लढतीत ऐतिहासिक ठरेल, असे सर्वेक्षणाचे दावे आहेत. दरम्यान, ‘२०२० मध्ये मी व्हाइट हाउस सोडायलाच नको होते’, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. यामुळे यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला तर तो ट्रम्प स्वीकारणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.
आयाेवात कमला हॅरिस आघाडीवर
रविवारी आयाेवातील सर्वेक्षणात डाेनाल्ड ट्रम्प (४४%) यांच्यापेक्षा कमला हॅरिस यांनी आघाडी (४७%) घेतली आहे. ट्रम्प यांनी मात्र हे सर्वेक्षण निराधार असल्याचे म्हटले. आयाेवात पिछाडीवर राहू शकत नाही, असे ते म्हणाले.
रविवारपर्यंत साडेसात कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एनबीसीच्या सर्वेक्षणानुसार ही लढत अत्यंत चुरशीची होणार असून, ट्रम्प व हॅरिस या दोघांनाही ४९ टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला.
ट्रम्प हाच उत्तम पर्याय : निक्की
संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांनी ट्रम्प यांना आपला पाठिंबा जाहीर केला असून, हॅरिस यांच्यापेक्षा ट्रम्प हे उत्तम पर्याय असल्याचे म्हटले आहे.
मतदार ओळखपत्र बंधनकारक करा : ट्रम्प
निवडणूक प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त करीत ट्रम्प यांनी प्रत्येकास मतदार ओळखपत्र बंधनकारक करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. डेमोक्रॅटिक पार्टीचा ओळखपत्र बंधनकारक करण्यास विरोध आहे. कारण, त्यांना या निवडणुकीत गोंधळ माजवून मतदानात घोळ घालावयाचा आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला.