जिंकणार तर मीच ! ट्रम्प-हॅरिस यांचा दावा, अवघ्या एका दिवसावर आली अमेरिकेची निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 06:26 AM2024-11-04T06:26:30+5:302024-11-04T06:27:34+5:30
US Election 2024: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक एका दिवसावर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्यात तुल्यबळ लढत हाेत आहे. दाेन्ही उमेदवार आपणच जिंकणार, असा दावा करीत आहेत.
वाॅशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक एका दिवसावर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांच्यात तुल्यबळ लढत हाेत आहे. दाेन्ही उमेदवार आपणच जिंकणार, असा दावा करीत आहेत. अखेरच्या क्षणापर्यंत दाेन्ही उमेदवार मिशिगन, जार्जिया, आणि पेनसिल्हानिया या निकालाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या राज्यांत प्रचार करीत आहेत.
हॅरिस यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत न्युयाॅर्कमध्ये धावती भेट दिली. दुसरीकडे ट्रम्प यांनी मिशिगन येथे हॅरिस यांच्यावर टीकास्त्र साेडले. हॅरिस यांच्या आर्थिक अपघाताचा आपण अंत करणार असून लवकरच ट्रम्प यांच्या नव्या आर्थिक चमत्काराला सुरुवात हाेईल, असे ट्रम्प म्हणाले.
मिशिगनमध्ये पारडे ट्रम्प यांच्या बाजूने फिरले?
भारतीय आणि आफ्रिकन वंशाच्या नागरिकांसह मिशिगन या राज्यातील काही मुस्लिम मतदारांनी अखेरच्या क्षणी ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे. ही डेमाेक्रॅटिक मते हाेती. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये त्यांनी डेमाेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांना मते दिली हाेती.
ट्रम्प यांचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. उलट हॅरिस यांनी यापूर्वी कधीही स्वत:ला भारतीय समुदायाशी जाेडले नाही. असे येथील व्यावसायिक नेत्यांचे मत आहे.
अमेरिका-भारत भागीदारी महत्त्वाची
- कमला हॅरिस यांचे समर्थक व भारतीय वंशाचे डेमाेक्रॅटिक नेते नील माखीजा यांनी सांगितले की, जगासाठी अमेरिका-भारत भागीदारी खूप महत्त्वाची आहे.
- कमला हॅरिस राष्ट्राध्यक्ष झाल्यास ती आणखी वृद्धिंगत हाेईल. संरक्षण तसेच हवामान बदलासारख्या समस्यांवर भारत आणि अमेरिका जगाला मार्ग दाखवू शकतात.
-हे ओळखणाऱ्या राष्ट्राध्यक्षाची गरज असून कमला हॅरिस या त्यासाठी याेग्य आहेत, असे माखीजा म्हणाले.