अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 05:45 AM2024-11-06T05:45:25+5:302024-11-06T05:47:04+5:30
US Election 2024: माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यापैकी जगातील सर्वांत बलाढ्य देशाचा प्रमुख कोण होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
- चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली - माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यापैकी जगातील सर्वांत बलाढ्य देशाचा प्रमुख कोण होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अमेरिकेत मराठी लोकांची संख्याही खूप आहे. अशात या निवडणुकीबाबत अमेरिकेतील मराठी लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न 'लोकमत'ने केला.
अॅरिझोना या राज्याचे निवासी योगेश मंत्री यांच्या म्हणण्यानुसार या निवडणुकीत प्रो-चॉइस किंवा प्रो- लाइफ अर्थात गर्भपाताचा अधिकार असावा की नसावा, इमिग्रेशन आणि अर्थव्यवस्था हे तीन मुद्दे निर्णायक ठरणार आहेत. ट्रम्प प्रो-लाइफच्या बाजूने आहेत, तर कमला हॅरिस प्रो- चॉइसच्या बाजूने आहेत. ट्रम्प सर्रास खोटे बोलतात. लॉ अॅण्ड ऑर्डरशी त्यांना काहीही देणेघेणे नाही. जो माझा समर्थक नाही, तो या देशाचा शत्रू आहे, असे ट्रम्प यांचे ठाम मत आहे. अमेरिकेला नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता हवा असे अमेरिकेतील व्यावसायिक प्रकाश भालेराव म्हणाले, या निवडणुकीकडे मी अमेरिकन या दृष्टिकोनातून पाहतो. ही निवडणूक आणि अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्षांचे निर्णय आणि धोरण अमेरिकेच्या एकंदरीत पुढील वाटचालीवर कोणता परिणाम करतील, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कुणाला हॅरिस, तर कुणाला हवे ट्रम्प
■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९मध्ये टेक्सास येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतल्यापासून भारतातील लोकांचे ट्रम्प यांच्या बाबतीतील मत सकारात्मक झाले आहे. ट्रम्प निवडून आले. तर भारतासाठी खूप चांगले होईल, असे भारतात राहणाऱ्या लोकांना वाटते. ■ मात्र, पूर्व आणि पश्चिम अमेरि- केतील भारतीयांना ट्रम्प फारसे आवडत नाहीत. याउलट, कमला हॅरिस निवडून याव्यात, अशी भावना येथील काही मराठी लोकांमध्ये आहे, असे काहींनी सांगितले.