राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन बाहेर; कमला हॅरिस यांच्यामुळे ट्रम्प यांचा मार्ग सोपा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 07:49 AM2024-07-22T07:49:06+5:302024-07-22T07:49:46+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष आणि डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.

US Election Joe Biden out of the election race Kamala Harris becomes the presidential candidate | राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन बाहेर; कमला हॅरिस यांच्यामुळे ट्रम्प यांचा मार्ग सोपा?

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बायडेन बाहेर; कमला हॅरिस यांच्यामुळे ट्रम्प यांचा मार्ग सोपा?

US Presidential Election : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक यावर्षी ५ नोव्हेंबरला होणार आहे. अशातच  जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून स्वत:ला बाहेर काढत असल्याची घोषणा केली. अमेरिका आणि माझा पक्ष यांच्या हिताच्या दृष्टीने मी हा निर्णय घेतल्याचे जो बायडेन यांनी स्पष्ट केलं. मात्र आता ऐनवेळी बायडेन यांनी माघार घेतल्याने राष्ट्राध्यक्षपदाच्या  निवडणुकीत वेगळेच चित्र पाहायला मिळणार आहे. 

ट्रम्प यांना पराभूत करण्याची वेळ - जो बायडेन

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी माघार घेतल्याने अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक अधिक रंजक बनली आहे. बायडेन यांनी माघार घेतल्यानंतर या पदासाठी विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांना पाठिंबा असेल असेही ते म्हणाले आहेत. जो बायडेन यांनी सोशल मिडिया पोस्टमधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘माझ्या डेमोक्रॅट मित्रांनो, मी उमेदवारी न स्वीकारण्याचा आणि माझ्या उर्वरित कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून माझ्या कर्तव्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२० मध्ये पक्षाचा उमेदवार म्हणून माझा पहिला निर्णय कमला हॅरिस यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्याचा होता आणि मी घेतलेला हा सर्वोत्तम निर्णय होता. आज मी कमला हॅरिस यांना आमच्या पक्षाचा उमेदवार बनवण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा देत आहे. डेमोक्रॅट - आता एकत्र येण्याची आणि ट्रम्प यांना पराभूत करण्याची वेळ आली आहे, असे बायडेन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान

कमला हॅरिस यांना डेमोक्रॅट पक्षाकडून अध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली तर या निवडणुकीत त्यांना त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा मिळू शकणार आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्याबरोबरच्या डिबेटदरम्यान बायडेन यांना आपली भूमिका ठामपणे मांडता आली नव्हती. त्यानंतर बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी असे प्रयत्न सुरू असताना, कमला हॅरिस यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत होते. कमला हॅरिस डेमोक्रॅट पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार बनल्या आणि जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनतील. मात्र तरीही पहिल्या महिला उपराष्ट्रपती होण्याचा मान त्यांच्याचकडे आहे.

सर्वेक्षण काय म्हणतं?

अमेरिकेत बहुतांश सर्वेक्षणांमध्ये बायडेन यांच्यानंतर कमला हॅरिस यांना सर्वाधिक लोकप्रियता मिळाली आहे. कमला हॅरिस या आशिया-आफ्रिका वंशाच्या मतदारांमध्येही खूप लोकप्रिय आहेत. उपाध्यक्ष कमला हॅरिस या इतरांपेक्षा कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांमध्ये आणि महिलांमध्ये जास्त लोकप्रिय आहेत. त्यामुळेच कमला हॅरिस ट्रम्प यांना तगडी टक्कर देण्यास सक्षम असल्याचे मानले जात आहे. कमला हॅरिस लोकप्रियतेच्या बाबतीत ट्रम्प यांच्या जवळ आहेत. एका सर्वेक्षणानुसार ४७ टक्के मतदार ट्रम्प यांना पसंत करतात, तर ४५ टक्के मतदार कमला हॅरिस यांना पसंत करतात.

बायडेन यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही लढाई अगदी सोपी मानत आहेत. त्यांनी जो बायडेन यांना अमेरिकन इतिहासातील सर्वात वाईट अध्यक्ष म्हटलं होतं. माध्यमांच्या वृत्तानुसार, ट्रम्प म्हणाले की त्यांना वाटते की उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना बायडेनपेक्षा पराभूत करणे सोपे होणार आहे.
 

Web Title: US Election Joe Biden out of the election race Kamala Harris becomes the presidential candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.