अमेरिकेत निवडणुकीच्या ऐन धामधुमीतले ‘ऑक्टोबर सरप्राईज’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 04:37 AM2020-10-05T04:37:08+5:302020-10-05T04:38:51+5:30
अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहू लागले की प्रचाराला ऑक्टोबर महिन्यात जोर येतो. त्यामुळे आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत ऑक्टोबर महिन्यात काही ना काही अकल्पित घटना घडल्या आहेत.
अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक गाजते आहे. रिपब्लिक आणि डेमॉक्रॅट यांच्यात नेहमीप्रमाणे या निवडणुकीतही जोरदार रंगत पहायला मिळते आहे. खासकरून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोजच्या ट्विटमुळे कुठलातरी मुद्दा नव्याने चर्चिला जात आहे. डेमॉक्रॅटिक पार्टीचे ज्यो बायडन आणि रिपब्लिकनचे ट्रम्प यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आणि लगेचच डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची बाधा झाल्याची बातमी आली. आपले वर्तमान अध्यक्ष जे जे करतात त्याकडे संशयाने पाहणाऱ्या काही गोटांमध्ये अध्यक्षांना कोरोना हे या निवडणूक वर्षातले ‘ऑक्टोबर सरप्राइज’ तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. ऑक्टोबर सरप्राइज सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रेंडिंगमध्ये आहे. अमेरिकेत निवडणुकीचे वारे वाहू लागले की प्रचाराला ऑक्टोबर महिन्यात जोर येतो. त्यामुळे आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत ऑक्टोबर महिन्यात काही ना काही अकल्पित घटना घडल्या आहेत. त्या घडलेल्या घटनेने किंवा अर्थातच मुद्दाम घडवून आणलेल्या घटनेने चर्चेचा रंग बदलून गेल्याचे आतापर्यंत पहायला मिळाले आहे. याही निवडणुकीत ऐन मोक्याच्या वेळी वर्तमान अध्यक्षांनी आपल्याला कोरोना संसर्ग झाल्याचे जाहीर करून जे दिले ते ‘आॅक्टोबर सरप्राइज’ आहे /ठरेल की काय यावर आता अमेरिकेत चर्चा रंगली आहे.
कुठून आली ही संकल्पना?
१९८०च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा ही संकल्पना समोर आली. रोनाल्ड रेगन यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे विल्यम कॅसे यांनी त्यावेळी प्रथमच ‘आॅक्टोबर सरप्राइज’ ही टर्म वापरली होती. तेव्हापासून दर निवडणुकीत आॅक्टोबर महिन्याच्या ऐन धामधुमीत अमेरिकेत असे काही ना काही घडले/घडवले गेलेले आहे. आता यावर्षी काय होते, ते पहायचे!