अमेरिकी निवडणूक: दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 10:21 AM2024-11-03T10:21:23+5:302024-11-03T10:22:48+5:30
US Presidential Election 2024: अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक चार दिवसांवर आली असताना माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदूंच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्याचा मुद्दा मांडून नवा डाव प्रचारादरम्यान टाकला.
वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक चार दिवसांवर आली असताना माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदूंच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्याचा मुद्दा मांडून नवा डाव प्रचारादरम्यान टाकला. विशेषतः बांगला देशासह इतर ठिकाणी हिंदूविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा ट्रम्प यांनी निषेध केला होता.
हिंदूच्या भावनांचा आदर करून या समुदायाच्या मानवाधिकारांचे कट्टरवादी डाव्या विचारसरणीसह धर्मविरोधी अजेंड्यापासून रक्षण करण्याचे अभिवचन ट्रम्प यांनी दिले आहे. गुरुवारी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना ट्रम्प यांनी बांगला देशातील हिंसाचाराचा प्रामुख्याने उल्लेख केला. आपल्या नेतृत्वाखाली कुठेही असे प्रकार घडणार नाहीत, अशी हमी ट्रम्प यांनी दिली. ही नवी खेळी किती यशस्वी ठरेल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
'हॅरिस-बायडेन यांनी केले अमेरिकेचे नुकसान'
अमेरिकी उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलपासून युक्रेनपर्यंत अमेरिकेचे नुकसान केले असल्याचे सांगून आपण हिंदूंच्या अधिकारांचे रक्षण करू, अशी हमी ट्रम्प यांनी दिली.
दरम्यान, हिंदूज फॉर अमेरिका फर्स्टचे संस्थापक अध्यक्ष उत्सव संदुजा यांनी याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले. या मुद्द्यांमुळे निवडणुकीचे वारे बदलले, असा विश्वास संदुजा यांनी व्यक्त केला आहे.
ट्रम्प यांनी प्रचाराचा मोर्चा वळविला
■ राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी नवा राजकीय डाव टाकला आहे. रिपब्लिकन उमेदवार कधीही जिंकला नाही, न्यू मेक्सिको तथा वि प्रचाराला जात आहेत. त्यांनी अचानक मार्ग वळविला. या खेळीमुळे सारेच चकित झाले आहेत.
ट्रम्प अस्थिर, सूडभावनेने पछाडलेले : हॅरिस
डोनाल्ड ट्रम्प यांचे संतुलन हरवत चालले आहे. त्यांना बेलगाम सत्ता हवी आहे. त्यांच्या सूडभावना आणि जळाऊ वृत्ती ठासून भरली असल्याची कठोर टीका कमला हैरिस यांनी शुक्रवारी केली. लास वेगासमध्ये आयोजित सभेत बोलताना हॅरिस म्हणाल्या, ट्रम्प ही निवडणूक जिंकले, तर व्हाइट हाऊसमध्ये ते शत्रूची यादीच घेऊन येतील. दरम्यान, या सभेत प्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेझ सहभागी झाली होती.
भारतीयांसोबत दिवाळी
जो बायडेन आणि कमला हॅरिस यांनी गुरुवारी भारतीय अमेरिकींसोबत दिवाळी साजरी केली, यानिमित्त देशभरातील मंदिर आणि इतर इमारतींवर रोषणाई केली आहे. या प्रकाशपर्वानिमित्त अमेरिकेत लोकशाहीचा प्रकाश अधिक तेजपुंज व्हावा, असा संदेश त्यांनी दिला.