दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 07:15 AM2024-11-02T07:15:35+5:302024-11-02T07:16:57+5:30

विशेषत: बांगला देशासह इतर ठिकाणी हिंदूंविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा ट्रम्प यांनी निषेध केला होता.

US election: Trump's new trick in Diwali, the issue of protecting Hindu rights, will the cycle turn? | दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?

दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?

वाॅशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक चार दिवसांवर आली असताना माजी राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी हिंदूंच्या मानवाधिकारांचे रक्षण करण्याचा मुद्दा मांडून नवा डाव प्रचारादरम्यान टाकला. विशेषत: बांगला देशासह इतर ठिकाणी हिंदूंविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचा ट्रम्प यांनी निषेध केला होता.

हिंदूंच्या भावनांचा आदर करून या समुदायाच्या मानवाधिकारांचे कट्टरवादी डाव्या विचारसरणीसह धर्मविरोधी अजेंड्यापासून रक्षण करण्याचे अभिवचन ट्रम्प यांनी दिले आहे. गुरुवारी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना ट्रम्प यांनी बांगला देशातील हिंसाचाराचा प्रामुख्याने उल्लेख केला. आपल्या नेतृत्वाखाली कुठेही असे प्रकार घडणार नाहीत, अशी हमी ट्रम्प यांनी दिली. ही नवी खेळी किती यशस्वी ठरेल, हे निकालानंतरच स्पष्ट हाेईल.

‘हॅरिस-बायडेन यांनी केले अमेरिकेचे नुकसान’
अमेरिकी उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलपासून युक्रेनपर्यंत अमेरिकेचे नुकसान केले असल्याचे सांगून आपण हिंदूंच्या अधिकारांचे रक्षण करू, अशी हमी ट्रम्प यांनी दिली. दरम्यान, हिंदूज फॉर अमेरिका फर्स्टचे संस्थापक अध्यक्ष उत्सव संदुजा यांनी याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले. या मुद्द्यांमुळे निवडणुकीचे वारे बदलले, असा विश्वास संदुजा यांनी व्यक्त केला आहे. 

ट्रम्प अस्थिर, सूडभावनेने पछाडलेले : हॅरिस
डोनाल्ड ट्रम्प यांचे संतुलन हरवत चालले आहे. त्यांना बेलगाम सत्ता हवी आहे. त्यांच्या सूडभावना आणि जळाऊ वृत्ती ठासून भरली असल्याची कठोर टीका कमला हॅरिस यांनी शुक्रवारी केली. 
लास वेगासमध्ये आयोजित सभेत बोलताना हॅरिस म्हणाल्या, ‘ट्रम्प ही निवडणूक जिंकले, तर व्हाइट हाऊसमध्ये ते शत्रूंची यादीच घेऊन येतील.’ दरम्यान, या सभेत प्रसिद्ध गायिका जेनिफर लोपेझ सहभागी झाली होती.

ट्रम्प यांनी प्रचाराचा माेर्चा वळविला
राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली असताना डाेनाल्ड ट्रम्प यांनी नवा राजकीय डाव टाकला आहे. 
रिपब्लिकन उमेदवार कधीही जिंकला नाही, अशा न्यू मेक्सिकाे आणि व्हर्जिनिया या राज्यांमध्ये ते प्रचाराला जात आहेत. त्यांनी अचानक मार्ग वळविला. या खेळीमुळे सारेच चकित झाले आहेत.

भारतीयांसोबत दिवाळी 
जो बायडेन आणि कमला हॅरिस यांनी गुुरुवारी भारतीय अमेरिकींसोबत दिवाळी साजरी केली. यानिमित्त देशभरातील मंदिर आणि इतर इमारतींवर रोषणाई केली आहे. या प्रकाशपर्वानिमित्त अमेरिकेत लोकशाहीचा प्रकाश अधिक तेजपुंज व्हावा, असा संदेश त्यांनी दिला.

Web Title: US election: Trump's new trick in Diwali, the issue of protecting Hindu rights, will the cycle turn?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.