अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! कमला हॅरिस यांना पराभूत करत मिळवला दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 01:15 PM2024-11-06T13:15:39+5:302024-11-06T13:22:51+5:30
US Elections 2024:संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंतच्या निकालांमधून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष असतील हे स्पष्ट झाले आहे.
संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू असून, आतापर्यंतच्या निकालांमधून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष असतील हे स्पष्ट झाले आहे. अटीतटीची लढत असल्याचे सांगण्यात येत असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आज मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच जोरदार मुसंडी मारत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी घेतली. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्रपती म्हणून जानेवारी महिन्यात शपथ घेतील.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होण्यासाठी ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २७० मतं मिळवणं आवश्यक असतं. दरम्यान आतापर्यंत ४८१ निकाल हाती आले असून, त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना २६७ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. तर कमला हॅरिस यांना २१४ इलेक्टोरल मतं मिळाली आहे. मात्र डोनाल्ड ट्रम्प हे विस्कॉसिन, मिशिगन, अॅरिझोना, नेवाडा आणि अलास्का या राज्यांमध्ये आघाडीवर असल्याने ते तीनशेपार मजल मारतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
#USAElection2024 | Fox News projects Donald Trump wins the presidential election 2024 pic.twitter.com/IJz6OU7bi7
— ANI (@ANI) November 6, 2024
२०२० मध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या जो बायडन यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र पराभवाचा धक्का बसल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. तसेच त्यांनी आक्रमक प्रचार करत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारीही मिळवली होती. त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाकडून कमला हॅरिस यांनी आव्हान उभं केलं होतं. मात्र अटीतटीची मानली जाणारी ही अध्यक्षीय निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी सहजपणे जिंकली. त्यांनी अध्यक्षीय निवडणुकीत इलेक्टोरल मतांसह पॉप्युलर मतांमध्येही कमला हॅरिस यांना मात दिली आहे.