ट्रम्प विजयी, चार वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा राष्ट्राध्यक्ष, भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 07:37 AM2024-11-07T07:37:50+5:302024-11-07T07:40:47+5:30
US Elections 2024: साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प (वय ७८ वर्षे) यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान होणार आहेत
वॉशिंग्टन - साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प (वय ७८ वर्षे) यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदावर दुसऱ्यांदा विराजमान होणार असून, यावेळी त्यांना ५० राज्यांतील ५३८ जागांपैकी २९५ जागांवर विजय मिळाला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला २७०चा आकडा त्यांनी ओलांडला आहे. कमला हॅरिस यांनी २२६ जागा जिंकल्या आहेत.
याआधी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे २०१६ साली राष्ट्राध्यक्ष बनले होते. मात्र, २०२०च्या निवडणुकीत जो बायडेन यांनी त्यांचा पराभव केला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर आजवरच्या काळातील ट्रम्प हे अमेरिकेतील असे नेते आहेत की, जे चार वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. ट्रम्प निवडून आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्या उमेदवारांना थेट मतदान होत नाही. त्याऐवजी इलेक्टर्सची निवड केली जाते. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवाराच्या नावाने ते लढत देतात. प्रत्येक राज्यात या इलेक्टरची संख्या निश्चित केलेली आहे.
कसे विजयी झाले डाेनाल्ड ट्रम्प : सर्वसाधारणपणे ज्या राज्यात राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या उमेदवाराला सर्वात जास्त मते मिळतील, त्या राज्यातील सर्व जागा त्या उमेदवाराला मिळतात, तर नेब्रास्का व इतर राज्यांमध्ये वेगळी व्यवस्था आहे. या राज्यांत जो पक्ष जितकी इलेक्ट्रोरल मते मिळवेल, तेवढ्या जागा त्याला मिळतील. या सर्व कसोट्यांवर उतरून डोनाल्ड ट्रम्प हे विजयी ठरले आहेत.
दुसऱ्या महायुद्धानंतर आजवरच्या काळातील ट्रम्प हे अमेरिकेतील असे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत की, जे त्यानंतर पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीस उभे राहून हरले होते. मात्र त्यानंतर चार वर्षांनी पुन्हा या पदासाठी झालेल्या निवडणुकांत विजयी झाले.
अमेरिकेत सुवर्णयुग आणू : ट्रम्प
अमेरिकेत सुवर्णयुग आणणार, असे वचन डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या देशाच्या जनतेला बुधवारी दिले. त्यांनी सांगितले की, अमेरिकेला पुन्हा सर्वांत सामर्थ्यशाली करण्यासाठी मी पावले उचलणार आहे. याच दिवसासाठी देवाने माझा जीव वाचवला होता. ट्रम्प यांच्यावर १३ जुलै रोजी पेनसिल्व्हेनियामध्ये हल्ला झाला होता. एक गोळी कानाला लागून गेली होती.
मित्रा, अभिनंदन
- माझे मित्रवर्य डोनाल्ड ट्रम्प तुमचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल मनापासून अभिनंदन, अशा शब्दांत त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अभिनंदन केले.
- याआधीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत-अमेरिका या दोन देशांतील सहकार्य वाढण्यासाठी आपण पावले उचलली होती.
- आता देखील भारत-अमेरिकेतील व्यापक व जागतिक स्तरावरील भागीदारी अधिक दृढ होण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करतील, असे मोदी यांनी ट्रम्प यांना पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.