कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा; बराक ओबामांनी जाहीर केला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 06:47 PM2024-07-26T18:47:18+5:302024-07-26T18:47:56+5:30
कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होईल.
US Elections : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कमला हॅरिस यांची उमेदवारी जवळपास पक्की झाली आहे. बराक आणि मिशेल ओबामा यांच्यासह डेमोक्रॅटिक पक्षातील बहुतांश नेत्यांनी कमला यांच्या नावाला समर्थन दिले आहे. कालपर्यंत ओबामांचा विरोध होता, पण आज(शुक्रवार) त्यांनी कमला यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला. ओबामांनी उघडपणे पाठिंबा दिल्यामुळे कमला हॅरिस यांना निवडणुकीत मोठे बळ मिळणार आहे.
It means so much to have your endorsements, @MichelleObama and @BarackObama.
— Kamala Harris (@KamalaHarris) July 26, 2024
Let’s get to work. pic.twitter.com/rAuTyIlCai
ओबामा आणि मिशेल यांनी कमला यांच्या समर्थनार्थ व्हिडिओ संदेशही जारी केला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, या आठवड्याच्या सुरुवातीला आम्ही कमला हॅरिस यांना फोन केला होता आणि त्या अमेरिकेच्या महान राष्ट्राध्यक्ष बनतील, असे त्यांना सांगितले. कमला यांच्या उमेदवारीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. दरम्यान, ओबामा आणि मिशेल यांनी उमेदवारीला पाठिंबा दिल्यानंतर कमला यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून दोघांचे आभार मानले.
बायडेन यांची निवडणुकीतून माघार
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आगामी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच, त्यांनी उमेदवारीसाठी कमला यांचे नाव पुढे केले. दरम्यान, अमेरिकेत येत्या 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. एका बाजूला डोनाल्ड ट्रम्प आहेत, तर दुसऱ्या बाजूला कमला हॅरिस आहेत. गोळीबारानंतर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. त्यामुळे कमला हॅरिस त्यांना कसे आव्हान देते, हे पाहणे महत्वाचे आहे.