अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री म्हणाले... ‘मोदी है तो मुमकिन है!’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 07:43 AM2019-06-14T07:43:56+5:302019-06-14T07:44:20+5:30
भारत व अमेरिकेमध्ये व्यापाराच्या मुद्द्यावरून अनेक वाद आहेत.
वॉशिंग्टन : लोकसभा निवडणुकांत भाजपने मोदी है तो मुमकिन है अशी घोषणा दिली होती. त्याच हिंदी घोषणेचा आपल्या भाषणात पुनरुच्चार करीत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी दोन्ही देशांतील संबंध निश्चितच सुधारतील, असा दावा केला आहे. त्यासाठी आपण व भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.
भारत व अमेरिकेमध्ये व्यापाराच्या मुद्द्यावरून अनेक वाद आहेत. मात्र चर्चेद्वारे ते सोडवण्यास दोन्ही देश तयार आहेत, असे माइक पॉम्पिओ यांनी अमेरिका-भारत व्यापार परिषदेच्या बैठकीत स्पष्ट केले. त्यांचे हे मत म्हणजे अमेरिकेची भूमिकाच आहे. अमेरिकेशी संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत व पंतप्रधान मोदी प्रयत्नशील राहतील, अशी खात्री व्यक्त करून ते म्हणाले की, दोन्ही देशांकडे हिंद-प्रशांत सागर आणि जगाच्या भवितव्यासाठी एकत्र येऊन पुढे जाण्याची संधी आहे.
माइक पॉम्पिओ लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते नंतर श्रीलंका, जपान आणि दक्षिण कोरियाचाही दौरा करणार आहेत. ते सध्या पंतप्रधान मोदी यांचे गुणगान करीत आहेत आणि भारताशी संबंधही सुधारू इच्छित आहेत. मात्र प्रत्यक्ष चर्चेअंती काय होते, हे अधिक महत्त्वाचे आहे.
..............................
तणावाचे मुद्दे
सध्या अमेरिका व चीनमध्ये व्यापार प्रश्नावरून प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावरही अनेक अटी घालू पाहत आहेत. दुचाकी वाहनांचे आयात शुल्क जे १00 टक्के होते, ते भारताने अमेरिकेच्या टीकेनंतर ५0 टक्क्यांवर आणले आहे. तरीही ट्रम्प यांचे समाधान झालेले नाही. इराणकडून भारताने तेल घेऊ नये, यासाठीही ते आग्रही होते आणि भारताला आतापर्यंत अमेरिकेकडून व्यापारात मिळणार विशेष दर्जाही (जीएसपी) ट्रम्प यांनी काढून घेतला.