Coronavirus: अमेरिकेनं जपली मैत्री; अडकलेल्या भारतीयांना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 03:54 PM2020-05-02T15:54:42+5:302020-05-02T15:57:03+5:30
कोरोनाने अमेरिकेत हाहाकार माजविला असून, सर्व उद्योगधंदे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. त्या देशातील असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे आणि लॉकडाऊनमुळं नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या 'एच १ बी' व्हिसाधारकांना नव्या नोकरीचा शोध घेण्यासाठी वाढीव मुदत द्या. तोपर्यंत त्यांना अमेरिकेतच राहू द्या,' अशी मागणी करण्यात आली होती. यावर अमेरिकन सरकारने एच -१ बी व्हिसाधारक आणि ग्रीन कार्ड अर्जदारांना अमेरिकेत अतिरिक्त ६० दिवस थांबण्याची परवानगी दिली आहे. या संबंधित माहिती अमेरिकन नागरिकत्व व इमिग्रेशन सर्व्हिसनं (यूएससीआयएस) दिली आहे. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाने अमेरिकेत हाहाकार माजविला असून, सर्व उद्योगधंदे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत. त्या देशातील असंख्य लोक बेरोजगार झाले आहेत. यामध्ये ज्या एच -१ बी कामगारांना काढून टाकलं आहे. त्यांना नवीन नोकरी शोधण्यासाठी ६० दिवस देण्यात आले होते. तसेच या संबंधित नोटीस देखील पाठवण्यात आल्या होत्या. मात्र आता एच -१ बी व्हिसाधारक आणि ग्रीन कार्ड अर्जदारांना अमेरिकेत थांबण्यासाठी आता अतिरिक्त ६० दिवस देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ६० दिवसांच्या आत फॉर्म I-290B भरणं आवश्यक असल्याचे देखील अमेरिकन सरकारने जाहीर केले आहे.
एच -१ बी'च्या नियमांनुसार, बिगर अमेरिकी नागरिकाच्या व्हिसाची मुदत संपण्याआधी त्याची नोकरी गेल्यास नवी नोकरी शोधण्यासाठी त्याला ६० दिवसांची मुदत दिली जाते. नव्या नोकरीची तजवीज न झाल्यास अशा व्यक्तीला देश सोडावा लागतो. मात्र, सध्या अमेरिकेसह जगभर कोरोनाचं संकट घोंगावतं आहे. अनेकांच्या रोजगारावर अचानक कुऱ्हाड कोसळली आहे. अशा संकटाच्या काळात नवा रोजगार मिळवण्यासाठी बिगर अमेरिकी नागरिकांना वाढीव मुदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 63,871 बळी घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाग्रस्तांची संख्या 1,095,304 वर पोहचली आहे.