हाँगकाँग निदर्शनामागे अमेरिकेचा हात
By admin | Published: October 12, 2014 02:15 AM2014-10-12T02:15:08+5:302014-10-12T02:15:08+5:30
हाँगकाँगमध्ये लोकशाहीसाठी सुरू असलेल्या निदर्शनामागे अमेरिकेचा हात असल्याचा स्पष्ट आरोप चीनने केला आहे.
Next
>बीजिंग : हाँगकाँगमध्ये लोकशाहीसाठी सुरू असलेल्या निदर्शनामागे अमेरिकेचा हात असल्याचा स्पष्ट आरोप चीनने केला आहे. तिबेटी आणि शिनजियांगच्या फुटीरवादी चळवळीशी संबंधित अमेरिकी अधिका:याने आंदोलक नेत्याची भेट घेतली होती, असा दावा करीत हे आंदोलन अमेरिका अत्यंत कुशलतेने हाताळत असल्याचा आरोप चीनने केला आहे.
चीनमधील सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीच्या पीपल्स डेली ऑनलाईनने माध्यमातील वृत्ताच्या आधारे यावर व्यापक भाष्य केले आहे. त्यात म्हटले आहे की, नॅशनल इन्डोव्हमेन्ट फॉर डेमोक्रॅसी ऑफ द यूएसच्या (एनईडी) संचालक लुईसा ग्रीव्ह यांनी काही महिन्यांपूर्वी या आंदोलनाबाबत चर्चा करण्यासाठी या आंदोलनाशी संबंधित लोकांची भेट घेतली होती. ग्रीव्ह एनईडीच्या व्हाईस प्रेसिडेन्ट असून त्यांच्याकडे आशिया, मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेची जबाबदारी आहे.
गेल्या अनेक वर्षापासून तिबेट स्वातंत्र्य, अन्य विभागातील लोकशाही चळवळ तसेच चीन सरकारमधील हस्तक्षेपाबाबत त्यांचे नाव घेतले जात होते, असेही यात म्हटले आहे. अमेरिका लोकशाही, स्वातंत्र्य, मानवी हक्क आणि इतर मूल्यांच्या आडून अमेरिका अशा कृत्याचे समर्थन करीत आले आहे, असा आरोप आहे.
निदर्शकांचा ठिय्या
सरकारने लोकशाहीवादी नेत्यांशी होणारी प्रस्तावित बोलणी रद्द केल्याने हाँगकाँगमधील निदर्शनाची तीव्रता वाढली आहे. मोठय़ा संख्येने निदर्शक शहराच्या मुख्य भागात ठिय्या देऊन आहेत. माघार न घेण्याचा आंदोलकांनी निर्धार केल्याने हाँगकाँग सरकारने ही प्रस्तावित बोलणी रद्द केली.