अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात जर्मनीत ठेवलेला ५00 किलो वजनाचा जिवंत बॉम्ब सापडला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 08:11 AM2018-08-28T08:11:16+5:302018-08-28T08:12:44+5:30
बॉम्ब निकामी करण्यात यश : १९ हजार लोकांना अन्यत्र हलविले
फ्रँकफर्ट : जर्मनीतील एका शहरात दोन प्रचंड आकाराचे जिवंत बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्या बॉम्बच्या स्फोटाने मनुष्यहानी होऊ नये, म्हणून त्या भागात राहणाºया सुमारे १९ हजार लोकांना ताबडतोब अन्यत्र हलविण्यात आले. त्यानंतर ते दोन्ही बॉम्ब निकामी करण्यात आले. हे दोन्ही बॉम्ब दुसºया महायुद्धातील होते. अमेरिकन फौजांनी ते ठेवले असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
त्यातील एका बॉम्बचे वजन तब्बल ५00 किलो इतके होते. बॉम्ब निकामी केल्यानंतर स्थानिक प्रशासनाने त्यांची छायाचित्रे प्रसिद्धीस दिली. मात्र जर्मनीच्या पश्चिमेकडील लुडविगशॅफन या शहराच्या एका भागात ते सापडले, असे प्रशासनाने सांगितले. त्या भागात बांधकामासाठी काही मजूर जमीन खणत असताना, त्यांना बॉम्ब सापडले. त्यांनी ते लगेच स्थानिक प्रशासनाच्या नजरेस आणून दिले. त्यानंतर बॉम्ब नष्ट करणाºया पथकाला तिथे बोलावण्यात आले. बॉम्ब नष्ट झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच रहिवासी घरी परतले आहेत.
या आधीही होता सापडला
यापूर्वी सप्टेंबर २0१७ मध्येही फ्रँकफर्टमध्ये एक जिवंत बॉम्ब आढळला होता. तोही दुसºया महायुद्धाच्या काळातील होता आणि ब्रिटिश फौजांनी तो ठेवला होता, असे नंतर निष्पन्न झाले होते. तो निकामी करण्यापूर्वी तेथील ७0 हजार रहिवाशांना अन्यत्र हलविण्यात आले होते.