अमेरिकेने रोखली पाकची लष्करी मदत
By admin | Published: May 25, 2016 01:31 AM2016-05-25T01:31:48+5:302016-05-25T01:31:48+5:30
दहशतवादी हक्कानी गटाविरुद्ध पाकिस्तान स्पष्ट अशी पावले उचलत आहे हे अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेसला प्रमाणपत्रासह पटवून देईपर्यंत अमेरिकेकडून पाकिस्तानला ३०० दशलक्ष
वॉशिंग्टन : दहशतवादी हक्कानी गटाविरुद्ध पाकिस्तान स्पष्ट अशी पावले उचलत आहे हे अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनी काँग्रेसला प्रमाणपत्रासह पटवून देईपर्यंत अमेरिकेकडून पाकिस्तानला ३०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची लष्करी मदत अडवून ठेवणारा कायदा सिनेटच्या समितीने संमत केला आहे.
गेल्या आठवड्यात नॅशनल डिफेन्स अॅथॉरायझेशन अॅक्ट (एनडीएए) २०१७ या समितीने संमत केला. गेल्या वर्षीही समितीने हक्कानी नेटवर्कवर कारवाईची अट घातली होती. एनडीएए सिनेटसमोर मतदानासाठी येईल त्यावेळी अनेक सिनेटर्स त्यात सुधारणा सुचविण्याची अपेक्षा आहे. सिनेटची एनडीएएबद्दलची भूमिका ही सभागृहाच्या त्याबद्दलच्या भूमिकेपेक्षा (पाकिस्तानसह अनेक मुद्द्यांवर) वेगळी आहे. सभागृहाने गेल्या आठवड्यात संमत केलेल्या विधेयकाने पाकला अमेरिकेकडून मिळणाऱ्या ९०० दशलक्ष डॉलरच्या मदतीपैकी ४५० दशलक्ष डॉलर रोखून धरले आहेत. तर सिनेटने या दोन्ही रकमा अनुक्रमे ३०० आणि ८०० दशलक्ष डॉलरपर्यंत खाली आणल्या आहेत. अर्थात या दोन्ही रकमा पाकला देण्याआधी पाकिस्तान हक्कानी नेटवर्कविरोधात स्पष्ट अशी उपाययोजना करीत आहे, असे प्रमाणपत्र संरक्षणमंत्र्यांनी काँग्रेसला देणे आवश्यक आहे.
एनडीएए २०१६ ची मुदत येत्या ३० सप्टेंबरमध्ये संपत आहे. पाकला ३०० दशलक्ष डॉलरची मदत खुली करायची असल्यास हक्कानी नेटवर्कविरोधात
उपाय करीत आहे, असे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. संरक्षणमंत्र्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे पेटाँगॉनच्या प्रवक्याने सांगितले.