चीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 07:43 PM2020-05-28T19:43:53+5:302020-05-28T19:57:37+5:30
रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच या विधेयकावर स्वाक्षरी करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
वॉशिंग्टनः कोरोना विषाणूमुळे जगभरात परिस्थिती बिघडलेली असून, डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरस जगाला देणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी मुस्लिम कार्ड वापरण्याची योजना आखली आहे. अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळानं उईगर मुस्लिमांचा छळ करण्यासाठी जबाबदार असलेल्या चिनी अधिकाऱ्यांवर बंदी घालणाऱ्या कायद्याला मान्यता दिली आहे. आता हे विधेयक व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे. या विधेयकाच्या बाजूने 413 जणांनी मतदान केलं आहे. तर केवळ 1 मत विरोधात गेलं आहे. मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याबद्दल चीनवर बंदी घालण्याचे विधेयक अमेरिकेच्या सिनेटने एकमताने मंजूर केले. रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच या विधेयकावर स्वाक्षरी करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
चीन- अमेरिका वाद आणखी चिघळणार
उईगर मुस्लिमांच्या छळाविरोधातील मंजूर झालेल्या विधेयकावरून अमेरिका आणि चीन यांच्यात वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. चीननं अमेरिकेच्या या हस्तक्षेपाला सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटलं आहे, तर अमेरिकेनं मानवी हक्क आण नीतीमूल्यांशी हे प्रकरण जोडलं असून, मानवाधिकार आयोगामार्फत चीनला शह देण्याचा प्रयत्न चालवला आहे. व्यापार युद्ध, दक्षिण चीन समुद्र आणि कोरोना विषाणूच्या चौकशीवरून चीन आणि अमेरिकेत आधीच वाद सुरू आहे.
अमेरिकेच्या सिनेटमध्ये उईगर मुसलमानांबाबतचे मंजूर केलेले विधेयक पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. या विधेयकास इम्रान उघडपणे विरोध किंवा समर्थन करणार नाहीत. आजवर उईगर मुस्लिमांच्या दडपशाहीबाबत पाकिस्ताननं कोणताही विरोध केलेला नाही. पाकिस्तानला आर्थिक आणि लष्करी मदतीसाठी चीनची गरज आहे, तर चीनलाही भारताला घेरण्यासाठी पाकिस्तानची मदत घ्यावी लागते. त्याचवेळी इम्रान खान अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेणार नाहीत. कारण तेथूनही पाकिस्तानला मोठी मदत मिळत आहे.
कोण आहेत उईगर मुसलमान?
उईगर हा मध्य आशियात राहणारा एक तुर्की समुदाय आहे, ज्याची उईगर भाषादेखील तुर्की भाषेशी अगदी जुळलेली आहे. उईगर लोक तारिम, जांगर आणि तर्पण खो-यांच्या काही भागात वसलेले आहेत. उईगर स्वतः या सर्व भागास युगिस्तान, पूर्व तुर्कस्तान आणि कधी कधी चिनी तुर्कस्तान म्हणून संबोधतात. हा प्रदेश मंगोलिया, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत तसेच चीनच्या गांसू आणि चिंगाई प्रांत आणि तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या सीमेवर आहे. चीनमध्ये हे झिनजियांग उईगर स्वायत्त प्रदेश (एक्सयुएआर) म्हणून ओळखले जाते आणि हे क्षेत्र चीनच्या क्षेत्राच्या एक तृतीयांश आहे.
हेही वाचा
coronavirus: 31 मे रोजी लॉकडाऊन संपणार?; जाणून घ्या, 1 जूनपासून काय-काय सुरू राहण्याची शक्यता
आईची माया! स्वतःचा रिपोर्ट निगेटिव्ह; तरी लहानग्या कोरोनाबाधित मुलासोबत राहून देतेय वात्सल्याची छाया