'लोकशाहीवर चर्चा' करण्यासाठी अमेरिकेचे 110 देशांना निमंत्रण, भारताचे शेजारील देश यादीतून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:03 PM2021-11-24T12:03:34+5:302021-11-24T12:03:45+5:30
अमेरिकेने या व्हर्च्युअल बैठकीसाठी 110 देशांना निमंत्रण पाठवले आहे.
नवी दिल्ली: अमेरिकेन सरकारने लोकशाहीवर चर्चा करण्यासाठी व्हर्च्युअल डेमोक्रसी समिटमध्ये 110 देशांना निमंत्रित केले आहे. इराक, भारत आणि पाकिस्तानसह तैवानचा या देशांमध्ये समावेश करण्यात आला आहे, अशी घोषणा परराष्ट्र विभागाने मंगळवारी रात्री केली. प्रमुख प्रादेशिक भागीदारासोबत एकता दर्शविण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यत आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या समिटमध्ये 'हुकूमशाही विरुद्ध संरक्षण', 'भ्रष्टाचार विरुद्ध युद्ध' आणि 'मानवाधिकारांबद्दल आदर वाढवणे', या विषयांवर चर्चा होऊ शकते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी 9-10 डिसेंबर रोजी होणाऱ्या 'समिट फॉर डेमोक्रसी'साठी सुमारे 110 देशांना निमंत्रित केलं आहे. मात्र, या व्हर्च्युअल शिखर परिषदेसाठी चीनला निमंत्रण देण्यात आलेले नाही, तर अमेरिकेने चीनचा शत्रू देश तैवानला निमंत्रण पाठवले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या 110 देशांच्या यादीत नाटोचा सदस्य असलेल्या तुर्कीचेही नाव नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या देशांच्या यादीत रशिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशांनाही या यादीतून बाहेर ठेवण्यात आले आहे.
भारताला मिळाले निमंत्रण
कार्यक्रमासाठी अमेरिकेने भारतालाही आमंत्रित केले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी 9-10 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या कमिटी फॉर डेमोक्रसीसाठी भारताला निमंत्रणही मिळाले आहे. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाचा भाग असतील अशी अपेक्षा आहे. भारताशिवाय अमेरिकेने पाकिस्तान आणि इराकलाही यासाठी निमंत्रण पाठवले आहे.