अमेरिका-इराण संबंध तणावाच्या दिशेने
By admin | Published: March 21, 2016 02:45 AM2016-03-21T02:45:39+5:302016-03-21T02:45:39+5:30
इराणच्या सागरी हद्दीत प्रवेश करणाऱ्या व त्या कथित गुन्ह्याप्रकरणी अलीकडेच अटक करण्यात आलेल्या अमेरिकी नौसैनिकांचे स्मारक उभारण्याचा निर्णय इराणने घेतला आहे.
तेहरान : इराणच्या सागरी हद्दीत प्रवेश करणाऱ्या व त्या कथित गुन्ह्याप्रकरणी अलीकडेच अटक करण्यात आलेल्या अमेरिकी नौसैनिकांचे स्मारक उभारण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. त्यामुळे सुधारत असलेले इराण-अमेरिका संबंध बिघडण्याची शक्यता
आहे.
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे नौसैनिक चुकून इराणच्या सागरी हद्दीत घुसले होते. त्यामुळे इराणने त्यांना अटक केली होती. वस्तुस्थिती कळल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. आता त्याच सैनिकांचे इराण पुतळे तयार करणार
आहे.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. इराणच्या या निर्णयाने दोन्ही देशांतील संबंध आणखी तणावग्रस्त होऊ शकतात. त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यावरही त्यांच्या देशातून अंतर्गत टीका होऊ शकते. या मुद्यावरून रिपब्लिकन पक्ष त्यांच्यावर हल्लाबोल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. संयुक्त राष्ट्रांच्या शिफारशीनंतर यंदा जानेवारीत ओबामा यांनी इराणवरील निर्बंध उठविले होते.
या स्मारकाला ‘रहियान -ए-नूर’चा दर्जा देण्यात येणार आहे. त्यांचा लष्कराशी निगडित स्मारकात समावेश केला जाणार आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने १२ जानेवारी रोजी अमेरिकेच्या १० नौसैनिकांना पकडले होते आणि १६ तासांनंतर त्यांना सोडून दिले होते.
डेलीमेलच्या आॅनलाईन वृत्तानुसार रिव्होल्युशनरी गार्डमधील नौदल प्रमुख अली फदाकी म्हणाले की, अमेरिकी सैनिकांनी कशा प्रकारे इराणी सैनिकांसमोर आत्मसमर्पण केले होते, हे या पुतळ्यावरून दिसून येईल. अमेरिकी सैनिकांच्या अटकेची अनेक छायाचित्रे आमच्याकडे उपलब्ध असून त्यावरून हे पुतळे तयार करण्यात येतील. हे स्मारक ‘स्वर्ग’ या इराणी बेटावर उभारण्याचा सरकारचा मनोदय असल्याचे ‘टेलिग्राफ’च्या वृतात म्हटले आहे.