टाळ्यांचा कडकडाट, १५ वेळा उभे राहून सन्मान; भाषणादरम्यान मोदी-मोदी नावाचा गजर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 08:08 AM2023-06-24T08:08:11+5:302023-06-24T08:08:31+5:30
भाषणानंतर अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी सेल्फी आणि इतर गोष्टींसाठी पंतप्रधान मोदींना घेरले.
वॉशिंग्टन : ‘पंतप्रधान मोदी यांच्या भाषणादरम्यान अमेरिकी खासदारांनी ‘मोदी, मोदी’च्या घोषणा दिल्या. ७९ वेळा टाळ्यांचा गजर केला, तर तब्बल १५ वेळा उभे राहून त्यांनी मोदींच्या वक्तव्यांना सन्मान दिला. भाषणानंतर अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांनी सेल्फी आणि इतर गोष्टींसाठी पंतप्रधान मोदींना घेरले.
ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, भारत करतोय मदत
ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि विकासावर आभ्यास करण्यासाठी शक्तिशाली उच्च-ऊर्जा किरणे (न्यूट्रिनो बीम) निर्माण करण्यासाठी कार्यरत फर्मिलॅब ॲक्सिलरेटर संकुलाचे अत्याधुनिकीकरण करण्यासाठी अमेरिकेच्या ऊर्जा विभागाला १४० दशलक्ष डॉलर्सचे सुटे भाग भारत पुरवत आहे. या योजनेत सहभागाबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी भारताचे कौतुक केले. यामध्ये भारतीय अणुऊर्जा विभागाची मोठी भूमिका आहे.
अंतराळ क्षेत्रात नवे पर्व
भारत आणि अमेरिकेतील अंतराळ कराराने या दोन देशांतील संबंध आणखी दृढ होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात हा करार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आर्टेमिस करारामध्ये सामील होऊन भारताने अंतराळ सहकार्यात एक मोठे पाऊल पुढे टाकले आहे. मंगळ आणि इतर ग्रहांपर्यंत
अंतराळ संशोधनाचा विस्तार करण्याच्या उद्दिष्टासह २०२५ पर्यंत मानवाला चंद्रावर परत
पाठविण्याचा हा अमेरिकेच्या नेतृत्त्वाखालील प्रयत्न आहे.
राहुल गांधींवर टीका
मोदी म्हणाले की, मी समजू शकतो की विचार आणि विचारधारेवर वाद आहे, परंतु आज तुम्ही सर्व एकत्र येत भारत आणि अमेरिकेतील संबंधाचे यश साजरे करत आहात. घराघरात विचारांची लढाई होऊ शकते, पण जेव्हा देशासाठी बोलायचे असते तेव्हा आपण सर्वांनी एकत्र यायला हवे आणि तुम्ही हे करून दाखविले आहे, यासाठी अभिनंदन, असे म्हणत अप्रत्यक्षपणे मोदी यांनी राहुल गांधींवर टीका केली.
टोस्ट परंपरा व दोन नेते...
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, स्टेट डिनरला मी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘टोस्ट’ची परंपरा पाळली असली तरी आम्ही दोघेही मद्यपान करीत नाही, हे सर्वांच्या माहितीसाठी आवर्जून सांगत आहे.
किती भाषणे केली हेच विसरलोय...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी गुरुवारी स्टेट डिनर आयोजित केले होते. त्यावेळी काही नर्मविनोदी प्रसंगही घडले. या मेजवानीच्या आधी मोदी यांनी भाषण केले. त्यात ते म्हणाले की, अमेरिकेच्या दौऱ्यावर आल्यापासून मी अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहत आहे. भाषणे करत आहे. गुरुवारी किती भाषणे केली हेच आता मी विसरलो आहे.
...तर मीही गायलो असतो
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बायडेन यांच्या उत्तम आदरातिथ्यामुळे त्यांच्या पाहुण्यांना गाणे गाण्याची प्रेरणा मिळते. माझ्याकडेही गायनाची कला असती तर मीही गाऊन दाखविले असते, असे मोदींनी सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
‘एम्पायर स्टेट’ इमारत तिरंगी रोषणाईत न्हाली...
पंतप्रधान मोदींच्या तीन दिवसीय अमेरिकी दौऱ्याच्या निमित्ताने न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध ‘एम्पायर स्टेट’ इमारत गुरुवारी भारतीय तिरंग्याच्या रंगाप्रमाणे रोषणाईत उजळून निघाली. यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रोषणाई पाहताना अमेरिकेतील अनिवासी भारतीयांत प्रचंड उत्साह होता.
अशी झाली बायडेन यांची इच्छा पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०१४ साली अमेरिकेच्या दौऱ्यावर आलो असताना माझ्यासाठी तत्कालीन राष्ट्राध्यक्षांनी स्टेट डिनर आयोजित केले होते. त्यावेळी माझे नवरात्रीचे उपास सुरू असल्याने एकाही पदार्थाचा मी आस्वाद घेतला नव्हता. त्यावेळी जो बायडेन हे उपराष्ट्राध्यक्ष होते. तुम्ही इतका कडक उपास करू नका, थोडेतरी जेऊन घ्या, असा त्यावेळी बायडन मला आग्रह करत होते. मला जेऊ घालण्याची बायडेन यांची इच्छा २०२३ सालातील स्टेट डिनरला पूर्ण झाली आहे, असे मोदी यांनी सांगताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली.