चर्चेचा प्रस्ताव देऊन अमेरिका खोटे बोलत आहे - हसन रुहानी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 04:26 AM2019-06-26T04:26:14+5:302019-06-26T04:26:40+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अल खामेनी आणि आठ इराणी कमांडर यांच्यावर निर्बंध आणले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे.
तेहरान - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अल खामेनी आणि आठ इराणी कमांडर यांच्यावर निर्बंध आणले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे. एकीकडे आमच्या नेत्यांना काळ्या यादीत टाकायचे, तर दुसरीकडे चर्चेचे आवाहन करायचे. यावरून हे स्पष्ट आहे की, अमेरिका खोटे बोलत आहे, अशा शब्दात इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी अमेरिकेला लक्ष्य केले.
टेलिव्हिजनवर थेट प्रसारित कार्यक्रमात बोलताना रुहानी म्हणाले की, सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनी यांचे नाव काळ्या यादीत टाकले जाते, विदेशमंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांच्यावर निर्बंध आणले जातात. यावरून हे दिसून येते की, अमेरिका भ्रमित आहे. इराणने मागील आठवड्यात अमेरिकेचे एक ड्रोन पाडल्यानंतर या दोन देशांतील तणाव वाढला आहे. ट्रम्प यांनी त्यानंतर इराणवर हल्ल्याचा बेत आखला होता; पण ऐनवेळी हा निर्णय रद्द केला.
दरम्यान, अमेरिकेसोबतच्या चर्चेच्या प्रस्तावाबाबत इराण गप्प का आहे? असा सवाल अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी केला आहे. ते म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी चर्चेसाठी दरवाजे खुले केले आहेत; पण प्रत्युत्तरात इराण गप्प आहे.
‘चर्चेतून तोडगा काढा’
संयुक्त राष्ट्रे : अमेरिका आणि इराणमधील तणाव चर्चेच्या माध्यमातून दूर होणे आवश्यक आहे, असे मत संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केले आहे. दोन तास चाललेल्या बैठकीतून असा संदेश देण्यात आला की, इराणला वेगळे पाडण्यात येणार नाही. तथापि, संघर्षापासून दूर राहण्याची सूचनाही यात करण्यात आली आहे. त्यानंतर काही तासांतच संयुक्त राष्ट्रांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तथापि, संयुक्त राष्ट्रातील इराणचे राजदूत माजीद तख्त रवांची पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सध्याची स्थिती अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी अनुकूल नाही. जे आम्हाला धमकावीत आहेत, त्यांच्याशी चर्चा सुरू केली जाऊ शकत नाही.