दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेने दाखवली लष्करी ताकद; चीनच्या धमकीची उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 10:06 AM2020-07-07T10:06:29+5:302020-07-07T10:09:37+5:30
लष्करी ताकद दाखवण्यासाठी अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात त्यांचे सैन्य मोठ्या संख्येने पाठवले आहे
बीजिंग – भारत चीन यांच्यातील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनला ताकद दाखवली आहे. दक्षिण चीन समुद्रात अमेरिका सैन्याकडून युद्धाभ्यास करुन जोरदार प्रदर्शन करत आहे. सोमवारी अमेरिकेच्या ११ हायटेक फायटर जेटने परमाणु हत्यारांसह दक्षिण चीन समुद्रात उड्डाण घेतलं. दक्षिण चीन हा परिसर आहे ज्याठिकाणी जपानसोबत चीनचा सीमावाद सुरु आहे.
त्यामुळे चवताळलेल्या चीनने अमेरिकेवर आरोप केला आहे की, आपली लष्करी ताकद दाखवण्यासाठी अमेरिकेने दक्षिण चीन समुद्रात त्यांचे सैन्य मोठ्या संख्येने पाठवले आहे. विवादित क्षेत्रात आपली लष्करी ताकद दाखवण्यासाठी अमेरिका हे मुद्दामहून करत आहे असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी पत्रकारांना सांगितले. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने गुआममध्ये अण्वस्त्र आणणारी पेंटॅगॉनच्या बी -५२ एच बॉम्बसाठा विमानाने तैनात करुन आणि युद्धाभ्यास करून चीनला आपली शक्ती दाखवत आहे.
And yet, there they are. Two @USNavy aircraft carriers operating in the international waters of the South China Sea. #USSNimitz & #USSRonaldReagan are not intimidated #AtOurDiscretionhttps://t.co/QGTggRjOul
— Navy Chief of Information (@chinfo) July 5, 2020
चीनचे मिडीया ग्लोबल टाईम्सने अमेरिकेला धमकी दिली होती की, चीनचे सैन्य किलर क्षेपणास्त्र डोंगफेंग -21 आणि डोंगफेंग -25 अमेरिकन विमान वाहकांचा नाश करू शकतात. ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे की, दक्षिण चीन समुद्रात तैनात केलेले अमेरिकन विमान वाहक चिनी सैन्याच्या अधीन आहेत. चिनी सैन्य त्यांचा नाश करू शकतो. त्यावर अमेरिकन नौदलाने चीनला उत्तर दिलं आहे. तरीही आम्ही त्याच भागात तैनात राहणार आहोत, आमची दोन विमान वाहक अद्याप दक्षिण चीन समुद्राच्या आंतरराष्ट्रीय पाण्यामध्ये उभी आहेत. यूएसएस निमित्झ आणि यूएसएस रोनाल्ड रेगन आपल्याला घाबरत नाहीत असा टोला लगावला आहे. हा तोच सागरी भाग आहे ज्याठिकाणी चीन नेहमी आपल्या वर्चस्वाचा दावा करत असतो.
अमेरिकेने असे म्हटले आहे की, त्यांच्या युद्धाभ्यासाचा हेतू या प्रदेशातील प्रत्येक देशाला उड्डाण करणारे हवाई परिवहन, समुद्री क्षेत्रामधून जाणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार कार्य करण्यास मदत करणे हा आहे. तर चीन या भागाला आपली संपत्ती म्हणतो. दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त पार्सल बेटांवर चीन लष्करी सराव करीत आहे. या बेटावरुन चीन आणि व्हिएतनाम यांच्यात वाद सुरु आहे. बीजिंग जवळपास संपूर्ण दक्षिण चीन सागरावर आपला दावा करतो, चीनच्या या दाव्याला व्हिएतनाम आणि फिलिपींससह अन्य देश विरोध करतात.