उत्तर कोरियाचे नेते किम जोंग ऊन यांची प्रकृती गंभीर?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 01:51 AM2020-04-22T01:51:26+5:302020-04-22T06:54:34+5:30
वृत्ताला दुजोरा नाही; शस्त्रक्रियेनंतर प्रकृती बिघडली?
सेऊल : उत्तर कोरियाचे राष्ट्र संस्थापक दिवंगत किम-द्वितीय संग यांच्या जयंतीदिनी आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला हजर न राहिल्याने उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग ऊन यांच्या प्रकृतीविषयी उलट-सुलट चर्चा आहे. त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर किम जोंग ऊन यांची प्रकृती गंभीर असल्याच्या वृत्ताला दुजोरा न देता मंगळवारी दक्षिण कोरिया सरकारने सांगितले की, उत्तर कोरियात मात्र कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्या नाहीत. किम यांच्या प्रकृतीसंबंधीच्या अफवांबाबत कोणतीही माहिती नसल्याचेही दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
दक्षिण कोरियाच्या अध्यक्षीय प्रासादाचे (ब्ल्यू हाऊस) प्रवक्ते कांग मिन सोक यांनी निवेदन जारी करून म्हटले आहे की, काही प्रसार माध्यमांनी किम जोंग ऊन यांच्या प्रकृतीबाबत दिलेल्या वृत्ताला दुजोरा देणारी माहिती आमच्याकडे नाही. तथापि, या वृत्तानंतर उत्तर कोरियात मात्र कोणत्याही संशयास्पद वा असामान्य घडामोडी आढळल्या नाहीत.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यानेही किम जोंग ऊन यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे किंवा त्यांची प्रकृती बिघडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. व्हाईट हाऊस आणि विदेश विभागानेही त्या वृत्ताबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. सीएनएनने अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याचे किम जोंग ऊन यांची प्रकृती शस्त्रक्रियेनंतर गंभीर असल्याचे वृत्त दिले होते. दोन्ही कोरिया देशांच्या एकीकरण मंत्रालयानेही ऑनलाईन दैनिक एनकेच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यांची प्रकृती गंभीर नाही, असेही गुप्तचर संस्थेने म्हटले आहे. एनकेच्या वृत्तात असे म्हटले आहे की, किम जोंग ऊन यांच्या हृदयावर प्याँगयांग येथे शस्त्रक्रिया झाली असून त्यांच्या प्रकृती सुधारत आहे.
दक्षिण कोरियाच्या राष्ट्रीय गुप्तचर सेवेच्या एका अधिकाºयाने नाव उघड न करता सांगितले की, किम यांच्यावर शस्त्रक्रिया झाली की नाही, याला गुप्तचर संस्था दुजोरा देऊ शकत नाही.
किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी कोरानाविरुद्ध उपायावर चर्चा केली होती. त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. प्रकृतीच्या कारणामुळे किम यांना नेतेपद सोडावे लागले, तरी उत्तर कोरियात फारशी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाही. त्यांच्या बहीण किम यो जोंग यांचा सरकारमध्ये चांगलाच प्रभाव आहे. शिवाय किम परिवाराकडेच नेतृत्व ठेवण्याबाबत बहुतांश सदस्यांचे मत आहे.