यंत्रमानवी बोटींनी सज्ज होणार अमेरिकी नौदल
By admin | Published: October 6, 2014 12:09 AM2014-10-06T00:09:29+5:302014-10-06T00:09:29+5:30
अमेरिकी नौदलाचा ताफा लवकरच यंत्रमानवी गस्त बोटींनी (रोबोटिक) सज्ज होणार आहे. या यंत्रमानवी गस्त बोटीत खलाशी नसतील.
वॉशिंग्टन : अमेरिकी नौदलाचा ताफा लवकरच यंत्रमानवी गस्त बोटींनी (रोबोटिक) सज्ज होणार आहे. या यंत्रमानवी गस्त बोटीत खलाशी नसतील. लढाऊ जहाजांचे संरक्षण करण्यासोबत या रोबोटिक बोटी शत्रूंच्या लढाऊ जहाजाच्या दिशेनेही चाल करतील. यामुळे अमेरिकी नौदलाला निर्णायक चढाई करणे सोयीचे होईल.
नासाने मंगळावर पाठविलेल्या ‘रोव्हर’ बग्गीसाठी वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानाच्या धर्तीवर या रोबोटिक बोटी विकसित करण्यात आल्या आहेत.
या रोबोटिक गस्त बोटींची पहिली यशस्वी चाचणी आॅगस्टमध्ये व्हर्जिनियातील जेम्स नदीत करण्यात आली. या मानवरहित बोटींमुळे युद्धनौका शत्रूंचा पराभव करण्यास सक्षम होतील. आॅफिस आॅफ नेव्हल रिसर्चच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बोटींचे सेंसस आणि सॉफ्टवेअरमुळे या बोटींचा एक गट तयार करता येऊ शकतो.
कंट्रोल आर्किटेक्चर फॉर रोबोटिक एजंट कमांड अँड सेंसिंग नामक तंत्रज्ञान आॅफिस आॅफ नेव्हल रिसर्च ही संस्था विकसित करीत असून या तंत्राचा वापर कोणत्याही बोटीत करता येऊ शकतो.
या रोबोटिक गस्ती बोटींचे वैशिष्ट्य असे की, त्या युद्धनौकांचे संरक्षण करीत संशयित नौकांचा माग काढीत त्यांना घेराव घालण्यात सक्षम आहेत.
प्रसंगी आदेश मिळताच संशयित बोटींवर निशाणाही साधण्यात त्या सक्षम आहेत. तब्बल दोन आठवडे या बोटींची चाचणी घेण्यात आली, असे नौदल संशोधनप्रमुख अॅडमिरल मॅथ्यू क्लुंडर यांनी सांगितले. मल्लाका किंवा हॉर्मूझ सामुद्रधुनीतही या बोटी यशस्वीपणे संचार करू शकतात.
धोकादायक स्थितीत या बोटी नौसैनिक आणि खलाशांच्या मदतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी कामगिरी बजावण्यास सक्षम आहेत, असे आॅफिस आॅफ नेव्हल रिसर्चचे कार्यक्रम संचालक डॉ. रॉबर्ट ब्रिझोलारा यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)