इराण अणुकरारातून अमेरिका बाहेर; धक्कादायक निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:28 AM2018-05-10T01:28:32+5:302018-05-10T01:28:32+5:30
इराणने अणुकार्यक्रम बंद करावा आणि त्याबदल्यात त्यांच्यावर लादलेले निर्बंध हटवावे यासाठी २०१५ साली झालेल्या करारातून बाहेर पडण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने अनेक देशांना धक्का बसला असून, यामुळे जगासमोर नवे संकेट उभे झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याचा फटका भारतालाही बसू शकतो.
वॉशिंग्टन - इराणने अणुकार्यक्रम बंद करावा आणि त्याबदल्यात त्यांच्यावर लादलेले निर्बंध हटवावे यासाठी २०१५ साली झालेल्या करारातून बाहेर पडण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने अनेक देशांना धक्का बसला असून, यामुळे जगासमोर नवे संकेट उभे झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. याचा फटका भारतालाही बसू शकतो.
ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह संयुक्त राष्ट्राचे महासचिव अॅण्टोनिओ गुटेरेस यांनी ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका केली. ओबामा यांनी इराणशी केलेला करार ‘परफेक्ट’ होता, असेही संयुक्त निवेदनात म्हटले आहे. याचे आम्ही पालन करू, असेही त्यांनी म्हटले आहे.
रशिया म्हणाला, ट्रम्प यांचा निर्णय निराशाजनक असून, अमेरिकेने आंतरराष्ट्रीय नियम पायदळी तुडवले आहेत. चीन म्हणाला, ट्रम्प यांचा निर्णय चिंताजनक असून, आम्ही याचा निषेध करतो. आम्ही इराणशी असलेले संबंध तसेच ठेवू. इतर देशांनीही योग्य निर्णय घ्यावा.
ट्रम्प यांच्या बाजूने कोण?
ट्रम्प यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
- नेतन्याहू, पंतप्रधान, इस्रायल
करारातून बाहेर पडण्याच्या आणि इराणवर निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
- परराष्ट्र खाते, सौदी अरेबिया
ट्रम्प यांनी बाहेर पडण्याचे दिलेली कारणे
1. हे स्पष्ट आहे, की आम्ही इराणच्या अणुबॉम्बला
रोखू शकत नाही. हा करार सदोष आहे.
2. कराराने इराणला रोख कोट्यवधी दिले; परंतु आण्विक शस्त्रे हस्तगत करण्यापासून रोखले नाही.
3. अणुकार्यक्रमाचा वापर इराण अस्त्र बनविण्यासाठी करत आहे. बॅलेस्टिक मिसाइल तयार करत आहे. सीरिया, यमेन आणि इराकमध्ये दहशतवादी देशांना शस्त्रेही पुरवत आहेत.
4. इराणवर येत्या तीन ते सहा महिन्यांत निर्बंध लादण्यात येतील. तेल क्षेत्र, विमान निर्यात, धातूंचा व्यापार आणि डॉलर खरेदी करण्याचा सरकारची योजना यावर निर्बंध घालण्यात येतील.
ध्वज जाळून अमेरिकाविरोधात घोषणाबाजी
इराणच्या खासदारांनी संसदेच्या आवारात अमेरिकेचा ध्वज जाळून ‘अमेरिका मेली’ अशा घोषणा दिल्या. ट्रम्प यांना केवळ दबावाची भाषा कळते, अशी टीका इराणच्या संसद अध्यक्षांनी केली.
इराणचे प्रत्युत्तर
कोणता देश या करारांचे पालन करत नाही हे उघड झाले. करार कायम राहावा यासाठी अन्य देशांशी चर्चा करू. आता इराण युरेनियम साठ्यात वाढ करेल, असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी दिला.
ओबामा म्हणाले,
ही घोडचूक
ट्रम्प यांचा निर्णय ही घोडचूक आहे. कारण अमेरिकेची विश्वासार्हताच पणाला लागेल. जगासाठी हे धोकादायक आहे.